मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Kalate : ४४ हजार मतं घेऊनही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त! असं कसं झालं? वाचा!

Rahul Kalate : ४४ हजार मतं घेऊनही राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त! असं कसं झालं? वाचा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 03, 2023 01:43 PM IST

Rahul Kalate role in Chinchwad Bypoll Results : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या राहुल कलाटे यांना डिपॉझिट मात्र वाचवता आलेलं नाही.

Rahul Kalate
Rahul Kalate

Pune Bypoll Election Results 2023 : पुणे पोटनिवडणुकीच्या निकालांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. चिंचवडची जागा पुन्हा ताब्यात घेण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न फसले. बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी खेचलेल्या ४४ हजारांहून अधिक मतांमुळं राष्ट्रवादीला ही जागा गमवावी लागल्याचं दिसत आहे. मात्र, इतकी मतं खेचूनही कलाटे यांना स्वत:चं डिपॉझिट वाचवता आलं नसल्याचं समोर आलं आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे अशी प्रमुख लढत होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरत या निवडणुकीत रंग भरले. विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतं मिळाली. नाना काटे यांना ९९ हजार ४३५ तर, राहुल कलाटे यांनी तब्बल ४४,११२ मतं खेचली. कलाटे यांच्या बंडखोरीमुळं वातावरण बदललं आणि राष्ट्रवादीला विजय साकारता आला नाही.

असं असलं तरी राष्ट्रवादीला धक्का देणाऱ्या कलाटे यांनाही धक्का बसला आहे. भरघोस मतं घेऊनही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. डिपॉझिट वाचवण्यासाठी निवडणूक आयोगानं ठरवून दिलेला मतांचा कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार डिपॉझिट वाचवण्यासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला एकूण मतदानाच्या एक षष्ठांश मतं मिळणं आवश्यक असतं. राहुल कलाटे यांना ४४ हजार ११२ मतं मिळाली. चिंचवड विधानसभा निवडणुकीत २ लाख ८७ हजार १२८ मतदान झालं. त्यामुळं नियमानुसार उमेदवारांना ४७ हजार ८५५ मतं मिळणं आवश्यक होतं. कलाटे यांना त्या आकड्यापर्यंत पोहोचता आलं नाही. त्यामुळं त्यांना डिपॉझिट गमवावं लागलं.

निवडणुकीत डिपॉझिट जाणं ही नामुष्की समजली जाते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात लाखांच्याही वर मतं मिळवणाऱ्या कलाटे यांना यावेळची कामगिरी भविष्यात अडचणीची ठरणार आहे.

WhatsApp channel

विभाग