Jitendra Awhad on Lord Ram Controversy : प्रभू रामाला मांसाहारी म्हटल्यामुळं वादात अडकलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा वाद सुरूच आहे. आव्हाड यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.
ते 'पुढारी न्यूज' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'आव्हाड यांनी सुरुवातीलाच ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं व सुधीर फडके यांनी गायलेल्या गीत रामायणातील काही ओळी ऐकवून दाखवल्या. त्यात वनवासी राम व लक्ष्मण हे वनात राहण्यासाठी जाग शोधत असतानाचं संभाषण आहे. त्यावरूनही राम मांसाहारी होते हे स्पष्ट होत असल्याचं आव्हाड म्हणाले. गेली ७० वर्षे महाराष्ट्र हे ऐकत आलाय. लक्ष्मशास्त्री जोशी, आचार्य अत्रे हे देखील बोललेत, पण आजवर कधी त्यावर वाद झाला नाही. मग आजच वाद का, असा प्रश्न आव्हाड यांनी केला.
'सगळे पुरावे असतानाही मी लोकभावनाचा आदर करून माघार घेतली. तरी मला खुनाच्या, मान कापण्याच्या धमक्या येतायत. मी काही मेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही. राम बहुजन होता हे आम्ही म्हटलं की तुम्हाला इतका राग का येतो? बहुजन असल्याशिवाय का तो शबरीचं उष्टं बोर खाईल? हा राम बहुजनच असला पाहिजे. उष्ट कोणाचं कोण खातं?, असा सवाल आव्हाड यांनी केला.
'हे सगळे तार्किक वाद आहेत. पण काही लोकांना तर्काच्या आधारे भांडायचंच नाही. लोकांपर्यंत लॉजिक जाऊच द्यायचं नाही. बहुजनांनी अडाणी, अशिक्षित राहावं. बहुजनांना इतिहास समजताच कामा नये. हेच बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं. शिवाजी महाराजांचं चरित्र वेगळं रंगवलं. त्यांच्या पितृत्वाबद्दलच शंका उपस्थित केली. हे कसं चालेल, असा सवाल आव्हाड यांनी केला.
‘तुम्ही रामाला दुकानात ठेवू शकत नाही. की हा आमचा राम आहे, तोच घेऊन जा असं नाही होणार. आमचा राम वेगळा आहे. आदिवासींचा वेगळा राम आहे. तीनशे लोकांनी तीनशे प्रकारे रामायण लिहिलंय. आपापल्या परिप्रेक्ष्यातून लिहिलंय. आम्ही वाल्मिकी रामायण वाचतो. काही लोक तुलसी रामायण वाचतात. आता सरकारनंच सांगावं कोणी कुठलं रामायण वाचावं, असंही आव्हाड म्हणाले. आम्ही आमच्या कुलदैवतांना आणि ग्रामदैवतांना नैवेद्य म्हणून काय देतो? ते देव नाहीत का? आपल्याकडं लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात. तो श्रद्धेचा भाग आहे. कोणी कुणावर श्रद्धा ठेवायची हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?,’ असा प्रश्नही त्यांनी केला.
संबंधित बातम्या