राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सर्व पक्ष उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर संपवण्याच्या घाईत आहे. शरद पवार यांचे एकीकडे दौरे सुरू असतानाच दरम्यानच्या काळात पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून एक मुलाखतीचं पॅनल तयार करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी राज्यसभा सदस्य फौजिया खान, वंदना चव्हाण, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड केलं. पक्ष फुटल्यानंतर बहुतांश आमदार अजित पवारांसोबत गेल्याचे दिसून आले. त्यानंतर शरद पवार गटाकडे केवळ १३ आमदार उरले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागा लढवून ८ ठिकाणी विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे अजित पवार गटात सामील झालेले अनेक नेते माघारी फिरत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर भाजप सोडून अनेक मातब्बर नेते शरद पवार गटात सामील होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरद पवार गटाकडे विधानसभेचे तिकीट मागणाऱ्यांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून तिकीटीसाठी इच्छुक असलेल्या निवडक उमेदवारांची नुकतेच पुण्यात पक्षाच्या निवडणूक पॅनेलने मुलाखत घेतली. राधानगरीसाठी ए वाय पाटील, शिराळमधून स्नेहा देसाई, चंदगडसाठी अमरसिंह चव्हाण, कोल्हापूर (उत्तर)साठी व्ही. बी. पाटील, कागल साठी समरजितसिंह घाडगे, इचलकरंजीसाठी अशोकराव जांभळे इत्यादी इच्छुकांच्या मुलाखती शरद पवार यांनी घेतल्या. या मुलाखतीत शरद पवार इच्छुकांना अनेक प्रश्न विचारत असल्याचे समजले. परंतु पहिला प्रश्न हा ‘तुम्हाला पक्षाने तिकीट दिल्यास तुम्ही निवडून कसे येणार ते सांगा’ हा असतो, असं सूत्रांनी सांगितलं. याशिवाय मतदारसंघात पक्षसंघटन कसं आहे, निवडून येण्यासाठी काय काय नियोजन केले आहे, याची माहिती शरद पवार इच्छुकांकडून जाणून घेत असल्याचे कळते.
संबंधित बातम्या