Pune Loksabha Election : देशभरात मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहिर झाले. या निवडणूकीत पुण्यातील काही लढतीवर अवघ्या देशाचे लक्ष होते. बारामती, शिरूर नंतर सर्वाधिक चर्चा होती ती पुणे लोकसभा मतदार संघाची. या मतदार संघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर उभे होते. मात्र, या निवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांची जादू चालली नाही. विधानसभा निवडणूकीत ज्या कसबा मतदार संघातून धंगेकर निवडून आले होते. तेथील मतदारांनी धंगेकर यांना मते न देता मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य दिले. त्यामुळे तब्बल लाखभर मतांनी मुरलीधर मोहोळ हे निवडणूक आले.
पुणे लोकसभा मतदार संघ हा एकेकाळी काँग्रेसचा मतदार संघ होता. येथून सुरेश कलमाडी यांनी अनेकदा निवडून हा मतदार संघ काँग्रेसचा केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजपने पुणे लोकसभा मतदार संघात सरशी घेतली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने भाजपचा ३० वर्षांचा गड भेदनारे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. कसबा मतदार संघ हा भाजपचा गड मानला जातो. येथील लोकसंख्या ही प्रामुख्याने हिंदुत्व माणणारी आहे. हा मतदार संघ गिरीश बापट यांनी अनेक वर्ष ताब्यात ठेवला. तर ते खासदार झाल्यावर भाजपच्या मुक्ता टिळक या येथून आमदार झाल्या. मात्र, त्यांचे कर्करोगाने निधन झाल्याने येथे मार्च २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने येथील नगरसेवक असलेले रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला. भाजपवर तब्बल ३० वर्ष प्रेम करणाऱ्या येथील मतदारांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक दिले.
मार्च २०२३ मध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला. गेले ३० वर्षे भाजपच्या या भगव्या बालेकिल्ल्यात रासने यांचा पराभव करून धंगेकरांनी इतिहास रचला होता. मात्र, वर्षभरानंतर विधानसभेतील मतदार पुन्हा भाजपकडे वळल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकर यांच्यापेक्षा मोठी आघाडी घेतली.
मंगळवारी जाहीर झालेल्या अंतिम निकालानुसार, मोहोळ यांना कसब्यातून ८७ हजार ५६५ मते मिळाली, तर धंगेकर यांना ७३ हजार ८२ मते मिळाली. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागात पसरलेल्या आणि विविध पेठ आणि व्यापारी भागांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना १४ हजार ४८३ मतांची आघाडी मिळाली.
गेल्या तीन दशकांपासून नेहमीच भाजपला पसंती देणाऱ्या कसबा पेठेवर गेल्या वर्षी निवडणुकीनंतर भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केले होते, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी प्रचारादरम्यान भाजपच्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला तसेच त्यांना राष्ट्रीय निवडणूक आहे. आणि मोहोळ यांना मतदान करणे म्हणजे मोदी यांना मतदान करणे आहे, असे पटवून देण्यात बऱ्यापैकी भाजप करकर्ते यशस्वी झाले.
मुरलीधर मोहोळ हे मूळचे कोथरूडचे असले तरी त्यांनी कसबा पेठेतून प्रसिद्ध कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी चांगला समन्वय राखला आणि मध्यवर्ती भागातून विशेषत: भाजपला पाठिंबा देणाऱ्या भागात जास्त मतदान होईल याची काळजी घेतली. प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्ते अनेकदा आमच्या घरी येताना दिसले. उमेदवारही आमच्या सोसायटीत आला,' अशी माहिती सदाशिव पेठेतील रहिवासी आशा देशपांडे यांनी दिली. ही स्थानिक किंवा विधानसभा निवडणूक नसून राष्ट्रीय निवडणूक होती. आम्हाला मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे होते,' असे अभिजित दिवसे या मतदाराने सांगितले.
दुसरीकडे धांगेकर यांनी कोथरूड परिसरावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यांना कोथरूड येथून चांगल्या मतांची अपेक्षा होती, मात्र, भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरूडने मोहोळ यांना सर्वाधिक मताधिक्य दिले.
संबंधित बातम्या