मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी कसे?; घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शाहांना ठाकरेंच्या शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी कसे?; घराणेशाहीवर बोलणाऱ्या अमित शाहांना ठाकरेंच्या शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 28, 2024 01:40 PM IST

Sanjay Raut befitting Reply to Amit Shah : वारंवार घराणेशाहीवर बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

how jay shah become secretary of BCCI, Sanjay Raut questions amit shah over dynasty politics
how jay shah become secretary of BCCI, Sanjay Raut questions amit shah over dynasty politics

Sanjay Raut befitting Reply to Amit Shah : विरोधकांची 'इंडिया आघाडी' म्हणजे घराणेशाहीची एकजूट आहे अशी टीका करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जय शाह बीसीसीआयचे सेक्रेटरी कसे झाले? त्यांनी सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त सिक्सर मारले होते की कपिल देवपेक्षा जास्त विकेट घेतले होते?,’ असा बोचरा सवाल राऊत यांनी केला आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘अमित शाह हे इंडिया आघाडीबद्दल जे बोलत आहेत ते हास्यास्पद आहे. ते गृहमंत्री नसते तर त्यांचा मुलगा बीसीसीआयचा सेक्रेटरी झाला असता का? कुठल्या घराणेशाहीच्या गोष्टी करता,' असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला.

‘घराणी सुद्धा अशीच तयार होत नाहीत. त्या घराण्यांनाही प्रतिष्ठा असायला पाहिजे. ठाकरे कुटुंबानं ती आपल्या कामानं मिळवली आहे. ते आभाळातून पडलेले नाहीत. या घराण्याचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासात योगदान आहे. ठाकरे घराण्याचा फायदा भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे. स्वत:च्या मनाला विचारा. स्वार्थासाठी आम्ही घराणेशाही जपली नाही,’ असं राऊत यांनी सुनावलं.

‘जे मोदी-शाह घराणेशाहीबद्दल बोलतायत, ते ठाकरे व पवार घराण्याच्या योगदानाचे लाभार्थी आहेत. बाळासाहेबांच्या घराण्याचा हिंदुत्वाचा वारसा आहे, त्याचा लाभ मोदी आणि शाहांना मिळाला आहे. किंबहुना बाळासाहेब होते म्हणूनच भाजप महाराष्ट्रात वाढला. नाहीतर हा पक्ष महाराष्ट्रात औषधालाही दिसला नसता. बाळासाहेबांचं, त्यांच्या घराण्याचं बोट धरूनच हा पक्ष इथं वाढलाय,’ असं राऊत म्हणाले.

‘शरद पवार यांचं कुटुंब राजकारणात आहे. त्यांनी कधी म्हटलं नाही माझी मुलगी मुख्यमंत्री होणार म्हणून. त्यांची मुलगी वर्षानुवर्षे लोकसभा निवडणूक लढते आहे. पवारांनी कृषी, शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात जे काम केलाय, त्याचा गौरव यांच्याच सरकारनं पद्मविभूषण देऊन केला आहे. मग कुठल्या घराणेशाहीबद्दल बोलता? घराणेशाही भाजपनंच खऱ्या अर्थानं पोसली आहे. ज्यांना कुटुंब असतं तेच कुटुंबाबद्दल सांगू शकतात. जे लोक आडवाणी यांच्यासारख्या वडिलाधाऱ्या व्यक्तीला सांभाळू शकत नाहीत ते काय कुटुंबांवर बोलणार,’ असा खोचक टोलाही राऊत यांनी हाणला.

महाविकास आघाडीचं जागावाटप आज फायनल होणार

महाविकास आघाडीचं जागावाटप आज फायनल होईल, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. 'प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी देखील आमच्या सोबत आहे. मोदी आणि भाजपच्या एकाधिकारशाहीविरुद्ध लढण्याची प्रकाश आंबेडकर यांची भूमिक आहे. ते देखील संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत. आम्हीही त्यासाठीच लढतोय, असं राऊत म्हणाले.

IPL_Entry_Point