मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : फडणवीसांना डावलून मुख्यमंत्रीपद कसं मिळालं?, एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं!

Eknath Shinde : फडणवीसांना डावलून मुख्यमंत्रीपद कसं मिळालं?, एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 24, 2023 02:37 PM IST

Eknath Shinde : शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्यानंतर पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या डोक्यात काय सुरू होतं?, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Eknath Shinde Live Speech Today
Eknath Shinde Live Speech Today (Nitin Lawate)

Eknath Shinde Live Speech Today : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असतानाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड करत भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपद मिळवलं. मविआ सरकार पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होईल, असं सर्वांना वाटत असतानाच भाजपाच्या शीर्ष नेत्यांनी धक्कातंत्र वापरत एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. परिणामी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. परंतु आता बंडानंतर मुख्यमंत्रीपदासाठी कुणाची वर्णी लागणार होती आणि त्यावेळी पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं?, याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी केला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल, असं अनेकांना वाटत होतं. परंतु त्यावेळी लोकांच्या मनात जे होतं त्याच्या उलट घडलं. भाजपाचे आमदार शिंदे गटापेक्षा जास्त असतानाही मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री केलं. मला मुख्यमंत्री करण्यात देंवेंद्र फडणवीस यांचाही मोठा वाटा होता, खरंतर मी मुख्यमंत्री होण्यासाठी काहीही केलेलं नव्हतं. परंतु ऐनवेळी पीएम मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी लोकांच्या मनात होतं, त्याच्या उलट केलं, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं जो कौल दिला होता, तेच सरकार स्थापन व्हायला हवं, असा आमचा प्रयत्न होता. परंतु त्याला यश आलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याशी आमच्या विचारधारेचं गणित जुळत नव्हतं. शिवसेना आणि भाजपाची अनेक वर्षांपासूनची युती असल्यामुळं लोकांनी आम्हाला मतदान केलं. बाळासाहेब ठाकरे आणि पीएम मोदी यांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणुका लढवल्या. जनता मतपेटीतून बोलते, त्यामुळं त्यांच्या मनातलंच सरकार आम्ही बनवलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नेत्यांनी आपण काय बोलतोय याचं आत्मपरिक्षण करावं- मुख्यमंत्री

कायद्यानं एखाद्या नेत्यावर बंधनं घालन काहीही होणार नाही. प्रत्येकानं आपण काय करतोय किंवा काय बोलतोय, याचं आत्मपरिक्षण करायला हवं. कारण वाईट बोललेलं लोकांना आवडत नाही. त्यामुळं आपल्या कामातून विरोधकांना उत्तर देत कर्तृत्व सिद्ध करायला हवं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी वाचाळ मंत्र्यांना दिला आहे.

IPL_Entry_Point