26/11 : कसाबला फासावर लटकवण्यासाठी ९ वर्षांच्या चिमुकलीनं अशी केली होती न्यायव्यवस्थेला मदत?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  26/11 : कसाबला फासावर लटकवण्यासाठी ९ वर्षांच्या चिमुकलीनं अशी केली होती न्यायव्यवस्थेला मदत?

26/11 : कसाबला फासावर लटकवण्यासाठी ९ वर्षांच्या चिमुकलीनं अशी केली होती न्यायव्यवस्थेला मदत?

Nov 26, 2024 03:14 PM IST

Mumbai Attack 26/11: मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या हल्ल्यातून वाचलेली देविका रोटवान हिला आजही तो प्रसंग आठवला की शहारुन येतं. तिने अजमल कसाबला फाशी देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तिने दिलेल्या साक्षीमुळे हे शक्य झालं होत.

कसाबला फासावर लटकवण्यासाठी ९ वर्षांच्या चिमुकलीनं अशी केली होती न्यायव्यवस्थेला मदत?
कसाबला फासावर लटकवण्यासाठी ९ वर्षांच्या चिमुकलीनं अशी केली होती न्यायव्यवस्थेला मदत? (HT)

Mumbai Attack 26/11 : २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तान-आधारित लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता. चार दिवस चाललेल्या या दहशतवादी हल्यात हल्लेखोरांनी ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि नरिमन हाऊससह दक्षिण मुंबईतील प्रमुख ठिकाणांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ लोकांचा मृत्यू झाला. तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात देविका रोटावन ही एक नऊ वर्षांची मुलगी बाचावली होती. देविका आज २५ वर्षांची झाली आहे. या हल्ल्याच्या आठवणींमुळे देविका आजही अस्वस्त होते.

मुंबईवर हल्ला झाला तेव्हा देविका ९ वर्षांची होती. देविकाने दिलेल्या साक्षीमुळे अजमल कसाबला फाशीची शिक्षा दिली गेली. या हल्ल्या संदर्भात देविका म्हणाली, या दहशतवादी हल्ल्याला आज १६ वर्ष पूर्ण झाली आहे. मी ती रात्र कधीच विसरू शकत नाही.

देविका ही सीएसएमटी येथे गोळीबारात अडकून पडली होती. या हल्ल्यात टी थोडक्यात बाचावली होती. देविकाने पीटीआयला सांगितले की, "१६ वर्षे झाली, पण त्यावेळे मी काय करत होते, कुठे जात होते आणि हल्ला कसा झाला, या आठवणी आजही ताज्या आहेत.

देविका तिच्या वडील आणि भावासोबत सीएसएमटी येथे पुण्याला जात असताना दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. हा गोळीबार सुरू असतांना देविका तिचे वडील आणि भाऊ नुकतेच वांद्रे येथून सीएसएमटीला आले होते. त्यावेळी अचानक मोठा स्फोट झाला आणि गोळीबाराला सुरुवात झाली. यावेळी रेल्वेस्थानकावर मृतदेहांचा खच व रक्ताचा सडा पडला होता.

देविका देखील या हल्ल्यात जखमी झाली होती. तिच्या पायाला गोळी लागली होती. तिला तातडीने जेजे रुग्णालयात हलवण्यापूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातून बरे होण्यास तिला एक महिन्याचा कालावधी लागला. शरीवरच्या जखमा भरल्या. मात्र, मनावरची जखम कायम असल्याचं देवका हिने सांगितले.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख आरोपी अजमल कसाब विरुद्ध दिली साक्ष

देविका या हल्ल्याची साक्षीदार होती. या हल्ल्यात जीवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याला देविकाने पाहिले होते. मुंबई क्राइम ब्रँचने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला तेव्हा तिने दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्याचे मान्य केले. देविका म्हणाली, मी साक्ष देण्याचे मान्य केले कारण मी आणि माझ्या वडिलांनी दहशतवाद्यांना पाहिले होते, माझ्या समोर अजमल कसाबने अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याचा चेहरा मी कदापी विसरू शकणार नाही. मी त्याला कोर्टात ओळखले. माझ्या साक्षीच्या जोरावर कसाबला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती.

हल्ल्याच्या दोन वर्षांपूर्वी आई गमावलेल्या देविकाने दहशतवादाचा मुकाबला करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. दहशतवादाचा नायनाट झाला पाहिजे. लोकांनी आपल्या समाजातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलले पाहिजे. दहशतवादाचं मुळं पाकिस्तान आहे. त्यामुळे दहशतवादा विरोधात सामूहिक कृतीची गरज आहे.

देवीकाला या हल्ल्यात ३.२६ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली होती. तर यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे तिच्या वैद्यकीय उपचारांसाठी १० लाख रुपये तिला मिळाले.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याची आठवण

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईच्या सुरक्षे सोबत सागरी सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला. हे दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत आले होते. यानंतर त्यांनी विविध ठिकाणी स्फोट आणि गोळीबार करत तब्बल ६० तासांहून अधिक काळ मुंबईला वेठीस धरले होते. ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल आणि नरिमन हाऊस यासह विविध ठिकाणी त्यांनी हल्ले केले.

सुरक्षा दलांनी नऊ हल्लेखोरांना ठार मारले. तर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर खटला चालवण्यात आला. २०१२ मध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर