Mumbai: मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे नाल्याची सफाई करताना एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. शिंपोली रस्त्यावरील गोखले शाळेजवळील अंबाजी मंदिराजवळ दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही गुरुवारी (०८ ऑगस्ट २०२४) दुपारी घटना घडली. सुनील सिद्धार्थ वाकोडे (वय, ३५) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे.
बोरिवली पश्चिमेकडील अंबाजी धाम मंदिराजवळील शिंपोली रोडवर गुरुवारी दुपारी हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुनील सिद्धार्थ वाकोडे आणि रवींद्र लाटेकर (३०) यांना नाल्याची सफाई करण्यासाठी पाठवले. नाल्याची सफाई करण्यासाठी दोन्ही कर्मचारी नाल्यात उतरले. मात्र, विषारी धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरू लागला आणि ते बेशुद्ध झाले. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आर उत्तर वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या की, 'महापालिकेला माहिती दिल्याशिवाय कोणीही सार्वजनिक नाल्यात प्रवेश करू शकत नाही. मात्र, तरीही संबंधित हॉटेल मालकाने नाला साफ करण्यासाठी दोन जणांना सांगितले. मात्र, नाल्यात उतरताच विषारी धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यात एकाचा मृत्यू झाला तर, दुसऱ्याला अग्निशमन दलाच्या जवानाने वाचवले.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी दुपारी ४ वाजून २९ मिनिटांनी अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाले. त्यानंतर पालिका व पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मजुराला नाल्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी एका मजुराला मृत घोषित केले. तर, दुसऱ्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
'भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत हॉटेल कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या दोघांना आत कोणी पाठवले याची माहिती घेण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.