Employee Strike : कर्मचारी संपामुळं राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली; केवळ अत्यावश्यक सेवा सुरू
Employee Strike News : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यानंतर आता रुग्णालयातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळं पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नाशिकमधील शासकीय कार्यालयं ओस पडली आहेत. परिणामी सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुण्यातील आरटीओ विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले आहेत. त्यातच आता पुण्यातील ससून रुग्णालयातील कर्मचारी देखील संपामध्ये सामील झाल्यामुळं रुग्णांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मार्डच्या डॉक्टरांकडून अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाला ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुमारे ९० टक्के कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळं रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी मार्डच्या डॉक्टरांकडून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती आहे. रुग्णालयाच्या बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचीही सेवेसाठी मदत घेतली जात असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता संपकाळात रुग्णांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपुरात राज्य कर्मचाऱ्यांसह शिक्षक मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले आहेत. याशिवाय शहरातील अनेक रुग्णालयात काम करणारे डॉक्टरांनी देखील संपात सहभागी होत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी निदर्शनं केली आहेत. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आंतर रुग्ण विभागातील सेवा आणि शस्त्रक्रियेवर कर्मचारी संपाचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातही कर्मचारी संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मराठवाड्याची जीवनदायीनी असलेल्या घाटी रुग्णालयातील अनेक कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या संपामुळं सामान्यांना मोठा फटका बसत आहे.