Mumbai Viral news : मुंबईतील टॅक्सी चालकांचा प्रवाशांना बरेचदा वाईट अनुभव येतो. काही टॅक्सी चालक हे अरेरावी करत असतात तर काही जण हटकून जादा भाडे आकारतात तर अनेक टॅक्सीचालक गाडीत विसरलेले प्रवाशांचे सामान देखील देण्यास नकार देत असतात. मात्र, सांताक्रूझ येथील एक टॅक्सीचालक गेल्या ३० वर्षांपासून प्रामाणिकपणे प्रवाशांना सेवा देत आहे. या चालकाने गेल्या २० वर्षात आता पर्यंत १०० पेक्षा अधिक प्रवाशांना त्यांच्या गाडीत विसरलेले मोबाइल परत केले आहे. त्याच्या या प्रमाणीकपणाची दखल प्रवाशांनी देखील घेतली आहे.
अनेकांनी त्याच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर काहींनी त्याला थेट पत्र लिहून बक्षीस दिले. काहींनी तर त्याला थेट घरी जेवणाचे आमंत्रण दिले. प्रवासी सेवा हीच ईश्वरसेवा हा मूलमंत्र जपत आजही हा टॅक्सीचालक प्रवाशांना अविरत सेवा देत आहे.
गदाधर मंडल (वय ६२) असे या प्रामाणिक टॅक्सी चालकाचे नाव आहे. गदाधर मंडल हे सांताक्रूझ या ठिकाणी टॅक्सी चालवतात. मंडल हे मूळचे कोलकता येथील रहिवाशी आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते मुंबईत टॅक्सी चालवण्याचं काम करतात. हे काम ते प्रामाणिकपणे करत आहेत. गाडीत बसलेल्या प्रत्येक प्रवाशाशी सौदार्हपूर्ण वागात त्यांची आपुलकीने चौकशी करतात. गेल्या काही वर्षात त्यांच्या गाडीत अनेक प्रवासी मौल्यवान वस्तु विसरले आहेत. या वस्तु प्रामाणिक पणे मंडल यांनी पुन्हा प्रवाशांना परत केल्या आहेत. २००४ पासून ते आज पर्यंत त्यांनी १०० पेक्षा अधिक मोबाइल प्रवाशांना परत केले आहेत.
प्रवाशांनी देखील मंडल यांच्या प्रामाणिक पणाची जाणीव ठेवली. अनेकांनी त्याला बक्षीसं दिली तर काहींनी आर्थिक मदत केली. काही जणांनी तर थेट पत्र लिहून त्यांचे आभार मानले तर काही जणांनी त्यांना त्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल मार्गदर्शन देखील केले. मंडल हे स्वत: कमी शिकले आहेत. त्यांनी फक्त आठवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. आपली मुळे उच्च शिक्षित व्हावी हा त्यांचा कायम आग्रह होता. त्यांच्या प्रामाणिक पणाचे फलित त्यांना मिळालं. अनेकांनी त्यांना मदत केल्याने त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिल आहे. त्यांची मोठी मुलगी ही बँकेत व्यवस्थापक आहे. तर लहान मुलगा हा चार्टर्ड अकाऊंटंट असून तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला आहे.
गदाधर मंडल हे गेल्या ३० वर्षांपासून टॅक्सी चालवत आहेत. २००४ साली एका दाम्पत्याने त्यांची टॅक्सी भाड्याने घेतली होती. काही दिवस त्यांनी गदाधर यांच्या टॅक्सीतून प्रवास केला. मात्र, एक दिवस महिला तिचा फोन गाडीत विसरली. हा फोन गदाधर यांना मिळाला. या घटनेची माहिती त्यांनी महिलेला फोन करून दिली. त्यांनी महिलेला तिचा फोन परत केला. गदाधर मंडल यांचा हा प्रामाणिकपणा दाम्पत्याला आवडला व त्यांनी त्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. त्यानंतर आता पर्यंत त्यांनी अनेकांचे फोन व वस्तु त्यांना सुखरूप परत केल्या आहेत असे गदाधर यांनी सांगितले.
गदाधर मंडल म्हणाले, नागरिक त्यांचे फोन गाडीत विसरल्यावर फोन करतात. फोनची रिंग वाजल्यावर त्यांना त्यांच्या गाडीत फोन असल्याचं समजतं. फोन उचलून संबंधित व्यक्तीचा फोन उचलून मी त्यांना पत्ता विचारून त्यांना त्यांचा फोन परत करतो. २०१४ मध्ये गाडीत एक फोन पडला होता. हा फोन सायलेंट मोडवर होता. त्यावर तब्बल ७८ मिस कॉल आले. यामुळे फोन स्वीचऑफ झाला होता. गदाधर यांनी फोनमध्ये चार्जिंग करून फोन सुरू केला. हा फोन एका नर्सचा होता. त्यांनी तो फोन तिला परत केला. या बदल्यात महिलेने त्यांना २ हजार रुपये दिले व पत्र देखील लिहिले जे पत्र त्यांनी त्यांच्या टॅक्सीमध्ये ठेवले आहे.