Bombay HC: मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणं म्हणजे विनयभंग नाही - हायकोर्ट
Bombay High Court On Molestation : अल्पवयीन मुलीचा हात पकडून प्रेम व्यक्त करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजून केला आहे.
Mumbai: मुलीचा हात पकडून प्रेम व्यक्त करणे म्हणजे विनयभंग होऊ शकत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रिक्षाचालकाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रिक्षाचालकावर एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचा आरोप होता. वस्तुस्थिती पाहता आरोपीचा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा कोणताही लैंगिक हेतू नसल्याचे न्यायाधीश न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
धनराज बाबूसिंह राठोड असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, १ नोव्हेंबर २०२२ रोजी १७ वर्षीय पीडिताच्या वडिलांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीने आपल्या मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि आरोपी एकाच परिसरातील रहिवाशी असून ते एकमेकांना ओळखतात.आरोपी रिक्षाचालक आहे. पीडिताने अनेकवेळा शाळेत आणि ट्युशनला जाण्यासाठी आरोपीच्या रिक्षातून प्रवास केला आहे.
घटनेच्या दिवशी आरोपीने पीडिताला थांबवून तिला रिक्षातून घरी सोडतो, असे सांगितले. मात्र, पीडिताने नकार दिला. त्यावेळी आरोपीने पीडिताचा हात पकडून तिच्यावर असलेल्या प्रेम व्यक्त केले. तसेच तिला रिक्षात बसण्यासाठी आग्रह केला, जेणेकरून तो तिला घरी सोडू शकेल. मात्र, पीडिताने घटनास्थळावरून पळ काढला आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडिताच्या वडिलांनी आरोपीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर न्यायमूर्ती डांगरे यांनी आरोपीवर लावण्यात आलेले विनयभंगाचे आरोप निराधार असल्याचे सांगत त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.आरोपीचा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा कोणताही लैंगिक हेतू नसल्याचे न्यायमूर्तींने स्पष्ट केले. तसेच तो भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती करणार नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात आरोपीला ताकीद दिली. तसे केल्यास आरोपीला अटकेपासून दिलासा देणारा आदेश मागे घेण्यात येईल, असा इशाराही मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीला दिला आहे.