मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah : गृहमंत्री अमित शहांचा मराठवाडा दौरा रद्द; अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण...

Amit Shah : गृहमंत्री अमित शहांचा मराठवाडा दौरा रद्द; अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण...

Sep 15, 2023 10:27 AM IST

Amit Shah Marathwada Visit : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे औरंगाबादमध्ये येणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Amit Shah Aurangabad Visit
Amit Shah Aurangabad Visit (HT_PRINT)

Amit Shah Aurangabad Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १७ सप्टेंबरला म्हणजेच रविवारचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द केला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शहा मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये येणार होते. परंतु वेळेचं नियोजन होत नसल्याने अमित शहा यांनी औरंगाबादचा दौरा रद्द केला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमित शहांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच भाजपकडून औरंगाबादमध्ये जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु आता मुक्तिसंग्राम दिनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ सप्टेंबर म्हणजेच उद्या औरंगाबादमध्ये दाखल होणार होते. बिहारच्या दरभंगाहून ते थेट औरंगाबाद विमानतळावर विशेष विमानानं येणार होते. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. चिकलठाणा एमआयडीसीत अमित शहा यांची जंगी सभा होणार असल्याने भाजपकडून त्यासाठीची तयारी करण्यात येत होती. परंतु आता त्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अपात्रतेच्या याचिकेवर सुरू झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात होता.

येत्या १७ सप्टेंबरला मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जाणार आहे. मुक्तिसंग्रामाला ७५ वर्ष होत असल्याने प्रशासनाकडून या कार्यक्रमासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ७५ व्या मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा औरंगाबादमध्ये येणार होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु आता शहा यांचा मराठवाडा दौरा रद्द झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

WhatsApp channel