Deepak Kesarkar: हिट ॲण्ड रन संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्याला देशभरातील बस आणि ट्रक चालक विरोध दर्शवत आहे. नवीन कायद्यानुसार, ट्रकने अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद आहे. या काद्याविरोधात देशभरातील बस आणि ट्रक ड्रायव्हर्सनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याच पार्श्वभूमीवर स्कूल बस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. स्कूल बस चालकांनी संपामध्ये सहभागी झाल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनने संप पुकारला आहे. परिणामी, अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला. यावर दिपक केसरकर म्हणाले की, स्कूल बसच्या चालकांनी संपामध्ये सहभागी होऊ नये. अन्यथा कारवाईबाबत वेगळा विचार केला जाईल . नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कुणीही वागू नये. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
ट्रक चालकांच्या अंदोलनामध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक देखील सहभागी झाले आहेत. या संपाचा परिणाम आता दैनंदिन व्यवहारांवर पडायला सुरुवात झाली. राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, मुंबईतल्या एपीएमसी मार्केटवरही संपाचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत. ज्यामुळे भाजीपालाच्या दरात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या