Jitendra Awhad on Hit and Run Law : केंद्रातील मोदी सरकारनं आणलेल्या नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रकचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी कालपासून संप पुकारण्यात आला असून अनेक ठिकाणी संपाला हिंसक वळण लागलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्रकचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच, सरकारवर टीका केली आहे.
आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून यावर भाष्य केलं आहे. हा कायदा राक्षसी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'केंद्र सरकारनं जुन्या कायद्यामध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार अपघातात कोणी मरण पावल्यास वाहनचालकाला दहा वर्षे कैद आणि १० ते १५ लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. मुळात अपघात कसा झाला, अपघाताला जबाबदार कोण, याची कुठलीही तपासणी करण्याची तरतूद यामध्ये ठेवलेली नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
'आधीत देशात जेवढ्या ट्रकचालकांची गरज आहे, त्यापेक्षा ४० टक्के कमी ट्रकचालक सध्या उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत जर असे राक्षसी कायदे करण्यात आले तर कुणीही ट्रकचालक म्हणून काम करण्यास तयार होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
'भविष्यात हाच कायदा कारचालकांनाही लागू होणार आहे. एखाद्यानं चुकीच्या पद्धतीनं रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर शिक्षा रस्ता ओलांडणाऱ्याला की ट्रकचालकाला द्यायची? सर्व अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळेच होतात, असं गृहित धरणं कितपत योग्य आहे. भारतीयांना फक्त जेलचीच भीती दाखवायची, एवढंच आता सरकारचं काम उरलं आहे. यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवायचाच नाही, ही कुठली पद्धत आहे? जिथं रस्ता ओलांडायचा नसतो, तिथं रस्ता ओलांडला अन् अपघात झाला तर त्याच्या घरच्यांना दहा लाखांचा दंड आकारणार का? त्याच्या घरच्यांवर ती जबाबदारी टाकणार का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली आहे.
'कित्येक वेळा चुकीच्या पद्धतीनं रस्ता ओलांडणाऱ्याला वाचवताना अपघात घडतो आणि त्यात चालक दगावतात, याची जबाबदारी कोणावर? तेव्हा कुठलाही कायदा करताना सर्व बाजूनं त्याची तपासणी करून त्याचा अंमल करावा, अशी अपेक्षा असते. एकतर्फी विचार करून कायदा होऊच शकत नाही. ट्रकचालकांनी या कायद्याला विरोध केला आहे. माझा ट्रकचालकांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.