Malad Hit and run : मुंबईमध्ये हिट अँड रनच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वरळी येथे विनोद लाड नामक युवकाचा अशाच अपघातात शनिवारी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना शनिवारी पुन्हा एका महिलेचा हीट अँड रन अपघातात मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. एका भरधाव टेम्पोने एका नर्सला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
रेहाना मालपेकर (वय ४६) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मालाड येथे शनिवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार रेहाना मालपेकर या मालाड रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी जात असताना एका भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. मालाड पोलिसांनी टेम्पो चालक आरिफ शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मालपेकर यांच्या २१ वर्षीय मुलाने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
रेहाना मालपेकर या रिद्धिविनायक हॉस्पिटल येथे नर्स म्हणून काम करत होत्या. तर जहीर हा वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. शनिवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास रेहाना त्यांची शिफ्ट संपवून हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या. रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी त्या त्यांच्या मुलाला भेटल्या. दरम्यान, रेल्वे स्थानकाकडे जात असतांना एक भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना त्यांच्या रुग्णालयातील दुसरा वॉर्ड बॉय प्रशांत कांबळे याने पाहिली. त्याने जखमी रेहानाला ऑटोने रुग्णालयात परत आणले. कांबळे अयणे साईनाथ शॉपिंग सेंटरजवळून जात असतांना रेहानाला एका टेम्पोने धडक दिल्याचे दिसले. त्याने तातडीने टेम्पोचा क्रमांक नोंदवला होता. याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत वरळी सीफेस येथे एका रस्तावर दुचाकीवरून जात असतांना एका तरुणाला आलीशान बीएमडब्ल्यूने जोरदार धडक दिली होती. या घटनेत तरुण हा गंभीर जखमी झळ होता. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी २७ जुलै रोजी आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर तरुणाची शनिवारी उपचार सुरू असतांना प्राणज्योत मालवली. विनोद लाड असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या