Pune Yerwada hit and run : पुण्यात कोरेगाव येथील हीट अँड रन प्रकरण चांगलेच गाजले. यानंतर मुंबईत रविवारी एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने एका महिलेला चिरडले. या दोन्ही घटना ताज्या असतांना आता पुण्यात पुन्हा हीट अँड रनचे प्रकरण पुढे आले आहे. एका भरधाव इनोव्हा कारचालकाने उडवले. या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी चौक परिसरात रविवारी मध्यरात्री झाली. दुचाकीवरील पोलिस मार्शल गस्तीवर असतांना एका भरधाव वाहनाने त्यांना उडवले. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिस कर्मचारी समाधान कोळी असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर संजू शिंदे नामक पोलिस कर्मचारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खडकी पोलीस ठाण्याचे दोन मार्शल हे रात्री गस्त घालत होते. ते जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात बाईक वरून जात असतांना रात्री दीड वाजता अज्ञात ईनोवा गाडीने बोपोडी चौक येथे त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरधार होती की पोलिस कर्मचारी कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना मोठ्या जखमा झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर शिंदे हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच जखमी शिंदे यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहनचालक हा फरार झाला आहे. पोलिस फरार झालेल्या वाहन आणि वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
मुंबईतील वरळी परिसरात रविवारी सकाळी बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. ही कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एका नेत्याचा मुलगा मिहीर शहा चालवत होता. त्याने भरधाव वेगात गाडी चालवून मासे घेऊन आलेल्या दाम्पत्याला धडक दिली. या धडकेत महिला ही बोनेटवर पडली. मात्र, गाडी न थांबवता आरोपीने महिलेला फरफट नेले. यात तिच्या जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या वडिलांना आणि गाडीतील एकाला ताब्यात घेतले आहे. तर आरोपी मिहिर शहा हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी दारूच्या नशेत आलीशान पोर्शे कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना बड्या बिल्डर पुत्राने चिरडले होते. हे प्रकरण संपूर्ण देशात गाजले. या प्रकरणी आरोपी मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहून सोडण्यात आले होते. मात्र, जनक्षोभ उसळल्यावर त्याला बाल हक्क न्याय मंडळात पाठवण्यात आले. तर त्याचे वडील, आजोबा आणि आईला देखील या प्रकरणी अटक झाली होती. सध्या आरोपी मुलाला आणि त्याच्या आजोबाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.