Hingoli News: हिंगोलीतील सरकारी रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले. या प्रकारामुळे संबंधित महिलांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून ग्रामीण रुग्णालयात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होते. या धक्कादायक प्रकारानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीतील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात काल (१३ डिसेंबर) एकूण ४३ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर रुग्णालयात बेड नसल्याने या महिलांना जमीनीवर झोपवण्यात आले. थंडी गारठ्यात महिलांना जमीनीवर झोपवण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणांवर रोष व्यक्त केला. एवढेच नव्हेतर शस्त्रक्रियेनंतर महिलांच्या स्वच्छतेबाबत देखील काळजी घेतली जात नसल्याचे अनेकांनी आरोप केला. याप्रकरणी रुग्णालय आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे.
हिंगोली रुग्णालय प्रकारावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.'आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे. चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तुम्ही कितीही पैसे खा, मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रात सरकार आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यात सरकार येऊन ऐवढे दिवस झाले तरी, अजूनही पदांबाबत चर्चा सुरू आहे. तुम्ही आपापसात बसून चर्चा करत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देत नाही. अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर भर देऊ, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
देवेंद्र फडणवीसांकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली. फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या सचिवांना फोन केला आणि याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या