Hingoli Accident : हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने नाल्यात दुचाकी कोसळून दुचाकीवरील आई वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव असे या अपघातात ठार झालेल्या आई, वडील, मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील राहणारे आकाश जाधव हे बुधवारी रात्री त्यांची आई कलावती जाधव व वडील कुंडलिक जाधव यांना घेऊन दवाखान्यात जात होते.
दरम्यान, त्यांची गाडी ही डिग्रस वाणी गावाच्या शिवारात जवळ आली असता या मार्गावर अंधार असल्याने त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वेगात असलेली गाडी ही रस्त्याखाली असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या मार्गावर अंधार असल्याने आणि वर्दळ नसल्याने त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही. तसेच हा अपघात झाल्याचे देखील कळले नाही. आज सकाळी नागरिकांना नाल्यात दुचाकी आणि मृतदेह दिसल्याने ही घटना समजली. या घटनेमुळे संपूर्ण डिग्रस वाणी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी आले असून पंचनामा पूर्ण केला आहे. मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.