मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांचा विराट मोर्चा; गोहत्या, धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी

नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू संघटनांचा विराट मोर्चा; गोहत्या, धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 03:44 PM IST

Hindu Garjana Morcha : औरंगाबादच्या नामांतराच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू संघटनांनी विराट मोर्चा काढला आहे.

Hindu Garjana Morcha In Chhatrapati Sambhajinagar
Hindu Garjana Morcha In Chhatrapati Sambhajinagar (HT)

Hindu Garjana Morcha In Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर असं केल्याच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये आज विविध हिंदू संघटनांनी विराट मोर्चा काढला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही मोठ्या संख्येनं लोकांनी आंदोलनात सहभागी होत नामांतराच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. शहरातील क्रांती चौकातून हिंदू गर्जना मोर्चाला सुरुवात झालेली असून यात राजकीय नेत्यांसह शेकडो आंदोलकांनी भाग घेतला आहे. यापूर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण केलं होतं. त्यानंतर आता एमआयएमच्या आंदोलनाविरोधात हिंदू संघटनांनी विराट मोर्चा काढला आहे. त्यामुळं आता नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकातून निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी गोहत्याबंदी, लव्हजिहाद आणि धर्मांतरबंदी कायद्याची मागणी केली आहे. याबाबतचा कायदा महाराष्ट्रात तातडीनं लागू करण्यात यावा, अशीही मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. क्रांती चौकामार्गे निघालेला हा मोर्चा औरंगपुऱ्यातील महात्मा फुले पुतळ्याजवळ विसर्जित केला जाणार असल्याची माहिती आहे. हिंदू गर्जना मोर्चा सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भागांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय उपायुक्तांसह जवळपास ४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

संभाजीनगरमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न- दानवे

हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काढलेल्या मोर्चावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. अनेक लोक मोर्चाच्या आडून राजकारण करत असून त्यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. याशिवाय खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनाला भाजपचा छुपा पाठिंबा होता, असा गौप्यस्फोट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

IPL_Entry_Point