मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तसं कधीच ठरलेलं नाही - राज ठाकरे

Raj Thackeray : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तसं कधीच ठरलेलं नाही - राज ठाकरे

Jan 28, 2024 01:16 PM IST

Raj Thackeray on Hindi Marathi language : हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच, याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विश्व मराठी संमेलनात केला.

Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray at Vishwa Marathi Sammelan : ‘हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. मराठी, तमिळ, तेलुगु या जशा भाषा आहेत, तशीच हिंदी ही एक भाषा आहे. राष्ट्रभाषेचा निवाडा आपल्याकडं कधीच झालेला नाही,’ असं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलं आहे.

नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रावर तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाला राज ठाकरे यांनी नुकतीच हजेरी लावली. संमेलनात बोलताना मराठीच्या सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. त्याचवेळी हिंदी भाषेबद्दलची वस्तुस्थिती देखील सांगितली.

शिवरायांशी तुलना व्हावी असं कोणतं अचाट काम मोदींनी केलं?; संजय राऊत यांचा रोकडा सवाल

भाषेच्या अनुषंगानं चर्चा होत असताना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा प्रचार हल्ली अनेक ठिकाणी केला जातो. सर्वसामान्यांना देखील असंच वाटतं. मात्र, वास्तव तसं नाही. राज ठाकरे यांनी संमेलनात बोलताना याच मुद्द्याकडं लक्ष वेधलं.

ट्रेंडिंग न्यूज

‘मराठी माणूस जगभरात पसरलेला आहे. अनेक देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंद केलं पाहिजे. महाराष्ट्राचा विचार इतर लोकांमध्ये, देशांमध्ये जितका नेता येईल. आपली संस्कृती, परंपरा जितकी देशाबाहेर नेता येईल तितकं चांगलंच आहे. पण महाराष्ट्राकडंही आपण लक्ष दिलं पाहिजे,’ असं ते म्हणाले.

'महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आज मराठीऐवजी हिंदी कानावर येऊ लागते, त्यावेळी मला त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. हिंदी भाषा उत्तमच आहे. मात्र, हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नाही. जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशी हिंदी ही एक भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. अमूक एखादी भाषा राष्ट्रभाषा आहे असा कुठलाही निर्णय झालेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांचा वापर करण्याचं ठरलं. यापेक्षा अधिक काही नाही, असं राज ठाकरे यांनी यावेळी निदर्शनास आणलं.

मराठीला बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न

‘हिंदी ही उत्तम भाषा आहे. हिंदी सिनेमांतून ती आपल्याकडं आली. पण आपण बोलण्यात हिंदी का वापरतो हे समजत नाही. मराठी भाषा इतकी उत्तम आहे. या भाषेत जो विनोद होतो, तो दुसऱ्या कुठल्या भाषेत होतो असं मला वाटत नाही. इतकी समृद्ध भाषा आहे. मात्र, ही भाषा बाजूला सारण्याचा जो राजकीय प्रयत्न होतोय ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाते,’ असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

Bihar Politics : नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; कारणही सांगितलं!

मी अत्यंत कडवट मराठी

'गेली अनेक वर्ष मी मराठी विषयावर बोलतोय, अंगावर केस घेतल्या आहेत. मराठीच्या मुद्द्यावर मी जेलमध्येही गेलो. मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही तसेच झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरूपात झाले. बाळासाहेबांचे, माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक बुजुर्ग लोकांचे झाले. महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसंजसं समजलं, तसा मी आणखी त्याच्या प्रेमात पडत गेलो, असं राज म्हणाले.

अमेरिकेत १०० मराठी शाळा

‘अमेरिकेतील मराठी मंडळानं जूनमध्ये मला आमंत्रित केलं आहे. मंडळाचे अध्यक्ष मला इथं भेटले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आम्ही अमेरिकेत १०० मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरू होतात, हे काही कमी आहे का?,’ असं समाधानही त्यांनी व्यक्त केलं.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर