Criminal Hemant dabhekar met MP srikanat Shinde : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी भेट घेतल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. ही घटना ताजी असतांना कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या वाढदिवाच्या दिवशी भेट भेटली असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दोघांच्याही भेटीचा फोटो व्हायरल होत असून पार्थ पवार यांच्या प्रमाणे श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील टीका होत आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत गुंडाराज अशी टीका केली आहे.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या गुन्ह्यात साथीदार आहे. गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा सध्या जामिनावर बाहेर आहे. तर शरद मोहोळचा तो अत्यंत विश्वासू मानला जातो. दोघांच्या भेटीमुळे आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेवर टीका केली जात आहे.
खासदार संजय राऊत यांनी दोघांचा फोटो ट्विट केला आहे. संजय राऊत यांनी राज्यात गुंडाराज असल्याची टीका केली आहे. त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत त्यांना जाब विचारला आहे. माननीय गृहमंत्री देवेन्द्रजी जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सामनाच्या अग्रलेखातून देखील संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांना अकट करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत. गायकवाड यांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे 'मनी लॉण्डरिंग'चे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा. 'ईडी'ने गायकवाड यांचा जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी. हे कोट्यवधी रुपये काही सरळ मार्गाने आलेले नाहीत. गुन्हेगारीतून आलेला पैसा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. हे सरळ 'मनी लॉण्डरिंग'चे प्रकरण आहे व त्याबद्दल त्यांना 'पीएमएलए' कायद्याने अटकच व्हायला हवी, असे अग्रलेखात म्हटले आहे.
राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरून राऊत आणि केंद्र सरकार वर देखील टीका केली आहे. राज्याच्या वाढत्या गुन्हेगारीला केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. राज्यातील अनेक मोठ्या घटनांचा अग्रलेखात उल्लेख करत शिदि गँगचे प्रकाश सुर्वे हे जाहीरपणे लोकांचे हातपाय तोडण्याची भाषा करतात, त्यांचे पुत्र बिल्डरांच्या कार्यालयात घुसून धमक्या देतात. आणखी एक गैंग मेंबर सदामामा सरवणकर हे जाहीरपणे पिस्तुलांचे बार उडवतात व सरकारचे मिंधे पोलीस त्यांना पाठीशी घालतात, असे अग्रलेखात म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे. पुण्यात अजितदादांच्या कृपेने जे घडते आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बेशरमपणाचे लक्षण आसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. पार्थ पवार यांनी कुख्यात गजा मारणेची त्याच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व 'विचारांची देवाणघेवाण' केली. गेल्या चार महिन्यांत पुण्यातील अनेक खतरनाक गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाला. गुन्हेगारीचे हे चित्र चांद्यापासून बांद्यापर्यंत सुरूच असून त्यामुळे राज्यात गुंडांचेच राज्य असून 'सागर' आणि 'वर्षा' बंगल्यावर त्यांचे 'बॉस' आहेत, असे सत्ताधारी पक्षाचेच आमदार जाहीरपणे सांगतात. तेव्हा कायद्याचे राज्य येणार कोठून? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.