पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

Nov 30, 2024 07:19 AM IST

Pune Helmet News: पुण्यासह राज्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही कारवाई शहरात करण्यात येणार नसून फक्त महामार्गावर करण्यात येणार आहे.

पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट
पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट

helmet compulsion in state : पुण्यासह राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता दुचाकीचालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाढते अपघात व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात पुणेकरांनी आवाज उठवला होता. या विरोधात नवनियुक्त आमदार हेमंत रासने यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही हेल्मेट सक्ती पुण्यात केली जाणार नसून केवळ महामार्गावर केली जाणार आहे, असे आयुक्त म्हणाले.

शहरातील रस्त्यांवर नागरिकांसाठी हेल्मेट नियम लागू केल्याच्या वृत्तानंतर आमदार हेमंत रासने यांनी पुणे पोलिसांनी असे कोणतेही निर्देश जाहीर केलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतल्यानंतर आमदार रासने म्हणाले, महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने दुचाकी आणि दुचाकीस्वारांना हेल्मेटचा नियम लागू असल्याचे पोलिस आयुक्त यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात हेल्मेट सक्तीची कारवाई तीव्र करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी मला फोन करून हेल्मेट नियमाची खातरजमा केली. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी शहरातील रस्त्यांवर नव्हे तर महामार्गावर करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेल्मेट सक्ती बाबत सदाशिव पेठ परिसरातील रोहन इनामदार म्हणाले, 'दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या प्रवाशांसाठी हेल्मेटचा नियम स्वत:च्या सुरक्षेसाठी आहे. अशा निर्णयाला विरोध करणे चुकीचे आहे. प्रियांका राठी म्हणाल्या, 'आम्ही शहरात दररोज अनेकदा प्रवास करतो आणि नेहमी हेल्मेट घालू शकत नाही. शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांवर असे नियम लादणे योग्य नाही. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार आणि उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.

शहरात वाहतुकीच्या बाबतीत शहरात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत, हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या अशा दोघांवर कारवाई करण्याचा आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना सोमवारी दिला होता. आधी काही ठिकाणी कारवाई देखील सुरू केली होती. त्याला विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तो निर्णय आता तूर्तास दिलासा मिळाल्याचं चित्र आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर