Traffic Advisory For Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर उद्यापासून पुढील तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत (९ एप्रिल २०२४) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेस वाहने चालवणे धोकादायक झाले. दुपारच्या सुमारास इंजिन गरम होणे, वाहनांनी पेट घेणे किंवा ईव्ही बॅट्रीजचा स्फोट होणे अशा घटना घडत असल्याने महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतेक ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे. परंतु, वाढत्या उन्हामुळे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय,इंजिन गरम होऊन वाहन पेट घेण्याची शक्यता असते. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
महामार्ग पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना पुढील तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच येत्या ६ एप्रिलपासून ९ एप्रिल दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. दरम्यान, अवजड वाहन मालक, चालक संघटनांनी पुढील तीन दिवस अवजड वाहने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर आणू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले.
महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एप्रिल, मे आणि जून महिन्यात सर्वाधिक तापमान असणार आहे. विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअसवर असण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे पुणे हवामान विभागाचे डॉ. होसाळीकर यांनी केले आहे. दिवसा असणाऱ्या तापमानाप्रमाणे रात्रीच्याही तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेल्या २८ दिवसांत २३ जण उष्माघाताचे बळी ठरले आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक ३, रायगड, पुणे, बीड, बुलढाणा आणि मुंबईला लागून असलेल्या कोल्हापूरमध्ये प्रत्येकी जणांचा मृत्यू झाला. तर, ठाणे, अहमदनगर, अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड आणि सातारा येथे उष्णघातामुळे प्रत्येकी एक जणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
संबंधित बातम्या