Pune Traffic change : पुण्यातील गणेशोत्सव अवघ्या राज्यातच नव्हे तर देशात व परदेशात प्रसिद्ध आहे. येत्या शनिवारी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. पुण्यातील गणेश मंडळाच्या सजावटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. दरम्यान, या काळात शहरात मध्यभागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५ ते १८ दरम्यान, शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या काळात शहरात मध्य भागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहतूक बदलांची काटेकोर पद्धतीने पालन करण्यात यावे असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहीनुसार पुण्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात मध्य भागात मोठी मंडळे देखावे सादर करत असतात. त्यामुळे येथून मोठी वाहतूक झाल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मध्यभागातील ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील मध्यभागात ५ ते १८ सप्टेंबर कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यात व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहने ये जा करत असतात. या व्यापऱ्यांना त्यांचा माल आता शहराबाहेर उतरावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर छोट्या वाहनातून त्यांनी साहित्य मध्यभागात आणावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. जड वाहन चालकांनी मध्यभागात वाहने आणू नयेत व वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी ते अलका चित्रपटगृह , टिळक रस्ता- जेधे चौक ते अलका चित्रपटगृह चौक, कुमठेकर रस्ता – शनिपार ते अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता- संत कबीर चौक ते अलका चित्रपटगृह चौक, केळकर रस्ता- फुटका बुरूज ते अलका चित्रपटगृह चौक, बाजीराव रस्ता- पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चाैक, छत्रपती शिवाजी रस्ता- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, कर्वे रस्ता- नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रस्ता – खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक, सिंहगड रस्ता- राजाराम पूल ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, मुदलीयार रस्ता, गणेश रस्ता, पॉवर हाऊस चौक ते दारूवाला पूल ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक.