Mumbai goa highway traffic : कोकणात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या सणासाठी नागरिक त्यांच्या गावी जात असतात. मुंबईत कामानिमित्त आणि व्यवसायानिमित अनेक कोकणवासी स्थायिक झाले आहे. असे असले तरी दरवर्षी हे नागरिक गणेशोत्सवासाठी गावी जात असतात. येत्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले असून या साठी मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात निघाले आहे. यामुळे आज सकाळ पासून मुंबई कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल ५ ते ७ किमी रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवतांना पोलिसांच्या देखील नाकी नऊ आले आहेत.
मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर व शहराच्या विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात कोकणवासी नागरिक आज सकाळ पासून विविध वाहनांनी गणेशोत्सवासाठी गावी निघाले आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच शनिवारी गणरायाचे आगमन होणार आहे. हा सण साजरा करण्याससाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. मात्र, मुंबई गोवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने त्यांची ही वाट अवघड झाली आहे. गुरुवारी पहाटेपासूनच मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
या मार्गावरील लोणेरे गावाजवळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहे. बुधवारी रात्रीपासून महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. या वाहतूक कोंडीत नागरिक अडकल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.
मुंबई गोवा मार्गावर मोठी वाहतुकी कोंडी झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत. तब्बल तासाभरापासून वाहने जागेवरच थांबले आहेत. त्यामुळे गावी जाणारे नागरिक वैतागले आहेत. दोन्ही मार्गिकांवर वाहने आल्यामुळं जवळपास ५ ते ७ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुढील काही दिवस वाहनांची ही कोंडी कायम राहणार आहे.
मुंबई गोवा मार्गावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी रायगड पोलिस सज्ज झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढल्याने येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रायगड पोलिसांनी या मार्गावर जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या मार्गावरील कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्यात येत आहे. ड्रोनच्या साह्याने देखील पोलिस वाहतूक कोंडीवर लक्ष ठेऊन उपाय योजना करत आहेत. या मार्गावर सध्या अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे तसेच एसटी बस थांबे देखील शहराबाहेर ठेवण्यात आले आहे.