मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकर निघाले फिरायला, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकर निघाले फिरायला, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 14, 2022 01:34 PM IST

शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवस रांगेत आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईतनं लोकांनी फिरायला बाहेर जायला सुरुवात केलीय. मात्र मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी कोंडी झालीय.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (हिंदुस्तान टाइम्स)

सलग आलेल्या तीन सुट्ट्यांचं गणित जमवून मुंबईकरांनी जवळपासच्या ठिकाणी जायचे प्लॅन्स आखले आणि मोठ्या प्रमाणावर आपापली वाहनं घेऊन मुंबईकर फिरायला बाहेर पडले खरे. मात्र वाढलेल्या वाहनांमुळे मुंबई पुणे टोल नाका जाम झाला आहे. मुंबई पुणे टोलनाक्यावर त्यामुळे वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. द्रुतगती महामार्गावर बोरघाटाजवळ वाहनांची संख्या अचानक वाढली ज्याचा परिणाम वाहतूक कोंडीत झालेला पाहायला मिळालाय. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनं अत्यंत संथगतीने पुढे सरकत आहेत. वाहनांची रांग लागल्यामुळे चालकांसह प्रवासी देखील कंटाळले आहेत.

एकीकडे वाहतूक खोळंबा झाला तर दुसरीकडे त्यात भर पडली ती द्रुतगती मार्गावर आज सकाळी टेम्पोचा छोटा अपघात झाल्याची. यामुळे या  टेम्पोच्या मागे असलेल्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. विकेण्ड असल्यामुळे मुंबईहुन चाकरमानी पुणे, लोणावळा आणि महाबळेश्वर इथे जाताना मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेत. सहाजिकच एक्स्प्रेसवेवर वाहनांची एकच गर्दी पाहायला मिळालीय.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर खालापूर टोलनजीक आणि बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ वाहनांची अर्धा ते एक किलोमीटरची भली मोठी रांग लागल्याचं चित्र आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर शुक्रवारीही प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. बोरघाटातील अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रेलरचा अपघात झाला होता. बोरघाटातील वाहतूक पोलीस चौकीनजीक ट्रेलर पलटी झाला होता. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामुळे खालापूर टोलजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची सुमारे दीड ते दोन किलोमीटर वाहनांची रांग लागली होती.

आजही सलग तीन दिवस सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर घराबाहेर पडलेत. धावपळीच्या आयुष्यातले काही क्षण निवांतपणे घालवण्यासाठी.मात्र तो निवांतपणा अनुभवण्याआधी या अशा ट्रॅफिक जामच्या संकटाचा मुंबईकरांना सामना करावा लागतोय. तेव्हा तुम्हीही मुंबईबाहेर फिरायला जायच्या मूडमध्ये असाल तर एकदा वाहतूक कोंडी कुठे कशी आहे त्याचा एकदा आढावा घ्या.

IPL_Entry_Point