नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका-heavy rains in nanded district one person washed away crops on 2 lakh hectares were affected ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार; एकजण वाहून गेला तर २५ जनावरे दगावली, २ लाख हेक्टरवरील पिकांना फटका

Sep 03, 2024 12:20 AM IST

heavy rains in Nanded : नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यात २ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २५ जनावरे दगावली आहेत. त्याचबरोबर एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार

गेल्या ४८ तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पासदगाव पुलावरून एकजण वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

उंचाडा येथे गावाजवळ कयाधु नदीच्या परीसरात जवळपास २५ लोक अडकले होते. जिल्‍हा आपत्ती व्यवस्थापन तुकडीने शोध व बचाव कार्य करुन २५ जणांना पुरातून सुखरुप बाहेर काढले.

२५ जनावरे मृत्युमुखी -

२५ जनावरे मृत्युमुखी पडली असून काही प्रमाणात घरांचेही नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गोदावरी नदीची नांदेड शहरातील धोक्याची पातळी ३५४ मीटर आहे. संध्याकाळी ८ वाजता ही पातळी ३५२.७५ होती. या परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचाव पथक तैनात असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नांदेड, अर्धापूर सर्वाधिक पाऊस-

सोमवारी नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, नायगाव, या  तालुक्यांमध्ये  जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, दभाद, भरड, मालेगाव या मंडळामध्ये  सर्वाधिक पाऊस झाला अर्धापूर मध्ये १७० मिलिमीटर पाऊस बारा तासात झाला आहे. तर नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण दोन्ही भागात सरासरी १२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरात सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारी नांदेड शहरात अनेक भाग जलमय झाले होते. गोदावरी नदी काठावरील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. 

धरणांमध्ये मुबलक साठा-

नांदेड जिल्ह्यातील २ सप्टेबर रोजी दुपारी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापूर धरणामध्ये पाणी  मोठ्या  प्रमाणात आले असले तरी धरणाची दारे मात्र उघडलेली नाही. शंकरराव चव्हाण विष्णूपरी प्रकल्प नांदेडची १४ उघडण्यात आली होती.

अपर मानार लिंबोटी धरणाची पंधरा पैकी ९ दरवाजे उघडलेले आहेत.लोअर मानार बारुळ  धरणाला अ‍ॅटोमॅटीक गेट आहेत. त्यामुळे येणारा विसर्ग जशाला तसा पुढे  जातो आहे. बळेगाव  हाय लेव्‍हल बॅरेजचे एकूण १४ दरवाजे उघडलेले आहेत. आमदुरा हाय लेव्‍हल  बॅरेजचे  सर्व  १६  दरवाजे उघडलेले आहेत. बाभळी हाय लेव्‍हल बॅरेजचे सर्व १४ दरवाजे उघडलेले आहेत. दिग्रस  धरणाचे १४ दरवाजे उघडलेले आहे. जायकवाडी पासून बाभळीपर्यत  सर्व गोदावरी वरील  बंधाऱ्यांचे दार उघडे आहेत.

विभाग