Mumbai local train : राज्यात आज किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई व उपनगरात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साचल्यामुळं मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलवर देखील परिमाण झाला आहे. तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या या १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आज मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देखील हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाची संतत धार सुरू असून यामुळे सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. रेल्वेट्रॅकवर देखील पाणी साठण्यास सुरवात झाली आहे. या पाण्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दक्षिण मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरू आहे. तर ठाण्यात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईकरांनी कामाला जाण्यासाठी सकाळपासून रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. मात्र, पावसामुळे अनेक लोकल गाड्या या उशिराने धावत होत्या. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे लोकल या १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावत आहे. सुदैवाने रेल्वे स्थानकात पाणी साचले नसल्याने रेल्वेवाहतूक ही सध्या तरी सुरळीत सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याण वरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या या विलंबाने धावत आहेत. त्यांना १० ते १५ मिनिटे उशीर झाला आहे. तर कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीएसटीएमएसला जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांमुळं लोकलला सिग्नल मिळत नसल्याने देखील लोकल सेवेला उशीर झाला आहे.
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळं रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साठले आहे. दादर पूर्वे रेल्वे स्थानक, माटुंगा-सायन किंग्ज सर्कल गांधी मार्केट परिसरात पाणी साचले आहे. तर आणखी काही भागात पाणी साचल्याचं वृत्त आहे. यामुळे वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे. तर काही भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जाम होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने मुंबई व उपनगरसह ठाणे, पालघर, परिसरात जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. मुंबईला असणारा यलो अलर्ट आज सकाळी ऑरेंज करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी रात्री पासून पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे.
संबंधित बातम्या