मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचा हाहाकार; विदर्भ,मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचा हाहाकार; विदर्भ,मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 18, 2022 09:16 AM IST

Rain Update : गेल्या २४ तासांपासून विदर्भात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. त्यातच आता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसानं जोर धरला आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update (HT)

Maharashtra Rain Update : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं राज्यात पुन्हा जोर धरला आहे. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळं विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून या अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका बसला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तयार झालेल्या पूरस्थितीमुळं प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या लोकांना खबरदारीचा इशारा दिला असून मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या पावसाची स्थिती काय?

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही मुसळधार पावसानं जोर धरला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील धरणांची सरासरी पाणीपातळी ९२ टक्क्यांवर पोहचली आहे. गंगापूर धरण ९४ टक्के भरल्यानं त्यातून गोदावरी नदीत तीन हजार क्यूसेक वेगानं विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, मालेगांव, पेठ आणि नांदगांव तालुक्यातही मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धुळे, जळगांव आणि अहमदनगरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला...

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची रिपरिप सुरू होती, परंतु कालपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे. याशिवाय नाशिकमधील धरणांतून औरंगाबादेतील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं आणि गोदावरी खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडीतून तब्बल ४७ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं पैठण आणि शेवगांवला जोडणारा पूर पाण्याखाली गेला असून प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विदर्भात पूरस्थिती कायम...

गेल्या २४ तासांपासून विदर्भात पावसाचा हाहाकार उडाला आहे. विभागातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सातत्यानं होणाऱ्या मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदीला पूर आला आहे, तर गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून त्यामुळं लाखांदूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर लाखांदूर ते वडसा या राष्ट्रीय महामार्गावर पूराचं पाणी आल्यानं भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. पूराचा वाढता धोका पाहता भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp channel