मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Konkan Rain : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाची तुफान बॅटिंग, शाळांना सुट्टी, राजापूर शहराला पुराचा वेढा

Konkan Rain : सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाची तुफान बॅटिंग, शाळांना सुट्टी, राजापूर शहराला पुराचा वेढा

Jul 08, 2024 10:28 AM IST

Konkan Rain update : कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुळसाधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक गावात पुरसदृश्य स्थिती तयार झाली आहे. तर राजापूर येथे पुरस्थिती तयार झाली आहे. संपूर्ण गावाला पाण्याने वेढले आहे.

कोकणाला कोसळधारा! राजापूर शहराला पुराचा वेढा; सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाची तूफान बॅटींग, शाळांना सुट्टी
कोकणाला कोसळधारा! राजापूर शहराला पुराचा वेढा; सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाची तूफान बॅटींग, शाळांना सुट्टी

Konkan Rain update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू  असून  सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलंडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गावाला पाण्याने वेढले आले. या गावातील घरात पाणी घुसले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य राबवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावात देखील पुरस्थिती असून अनेक घरात पुराचे पाणी घरात गेले आहे. तर मुंबई गोवा महामार्गावर देखील पाणी साठले आहे. रविवारी आणि सोमवारी सकाळपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. पुरातील पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राजापूरमध्ये नागरिकांच्या घरात घुसले पाणी

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरीच्या राजापूर शहरात मोठा पुर आला आहे. संपूर्ण गावात पाणी साचले आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. यामुळे राजापूर शहरात पाणी घुसले आहे. येथील जवाहर चौक पाण्यात बुडाला आहे. तर रस्त्यावर अडीच ते तीन फूट पाणी साठले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरायत देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. येथील वरची पेठ रस्ता देखील पाण्यात बुडाला आहे. तर काही घरात देखील पाणी घुसले असून नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक बचाव कार्य राबावत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यातील शीळ, गोठाणे दोनीवडेकडे जाणारा मार्ग देखील अर्जुना नदीच्या पुराखाली गेला आहे. पुरामुळे राजापूर येथील व्यापाऱ्यां धास्ती घेतली आहे. दुकानातील माल हलवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. पुराचा जवाहर चौक, गणेश घाट, शिवाजी पथ आठवडा बाजार रस्ता परिसराला फटका बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख आठ नद्यांपैकी तीन नद्या धोका पातळीच्या वरून वाहत आहेत. तर तीन नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. दरम्यान, चिपळूणमधील वाशिष्टी नदीची पाणी पातळी सुदैवाने अद्याप वाढलेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस बरसला आहे. जिल्ह्यातल्या हुमरमळा जवळ मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. तर हाथेरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शेतात व काही नागरिकांच्या घरात घुसले आहे. एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. येथील तेरेखोल नदी, कर्ली नदी, वाघोटन नद्या देखील दुथड्या भरून वाहत आहेत. नदी काठच्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले आहे. येथील भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. सिंधुदुर्गला हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२७ गावांचा संपर्क तुटला

वैभववाडी मधील तीथवली येथे देखील मुसळधार पावसामुळे घर कोसळले. तर कुडाळ मधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीच्या पुराच्या पाण्यात रस्ता उखरून खड्डा पडल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथे पुलावर पाणी साचले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातील मालपे पेडणे भागात दरड कोसळली आहे. येथील संरक्षक भिंत कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ही पेडणे शहरातून वळवन्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला देखील बसला असून या मार्गावरची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे.

WhatsApp channel