Kolhapur, Shivaji University : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा व कोकणात आणि विदर्भात पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीला पुर आल्याने कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ परिसरात पाणी साचल्याने येथील अनेक रस्ते हे बंद झाले आहेत. तसेच आज देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने शिवाजी विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा या स्थगित करण्यात आल्या आहेत. तर सातारा जिल्ह्यातील देखील काही विद्यालयाच्या परीक्षा या रद्द करण्यात आल्या आहेत. या स्थगित परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी शहरात शिरले असून अनेक रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत. सध्या नदीची पाणी पातळी ही ४० फुटांवर गेली आहे. तर ७८ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची प्रयाग चिखली येथे पाणी पातळी वाढल्याने परिसरात पाणी साचले आहे.
कोल्हापूर येथे दरवर्षी या प्रकारची पुरस्थिती निर्माण होत असते. यंदा देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास कोल्हापूर येथे पुरस्थिती निर्माण होऊन याचा परिमाण पुणे बंगरुळू मार्गावर होऊ शकतो.
राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुरस्थिती तयार झाली आहे. येथील काही गावे ही पाण्याखाली गेली आहे. मुंबईत देखील सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांववर मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पुर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे आणि परसरात देखील पावसाचा जोर कायम आहे. आपत्कालीन स्थितीसाठी राज्य भरात एनडीआरएफचे तब्बल १७ पथके तैनात करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या