मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Updates : मुंबई-पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट

Rain Updates : मुंबई-पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 12, 2022 09:05 AM IST

Maharashtra Rain Updates : गेले काही दिवस शांत असलेल्या पावसानं राज्यातील अनेक भागांमध्ये जोर धरला आहे. काल मुंबईत आणि पुण्यात झालेल्या पावसामुळं दोन्ही शहरांतील अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्याचं दिसून आलं.

Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain Updates (HT_PRINT)

Maharashtra Rain Updates : ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पावसानं मुंबई आणि विदर्भासह मराठवाड्यातही बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. कालपासून पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबादमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागानं (IMD) येत्या चार ते पाच दिवसांत विदर्भ आणि कोकणासह इतर भागांतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

ओडिशाच्या समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस विदर्भात विजेच्या कडकडाटासह तर मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं नागरीकांनी पुढील तीन दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

हवामान खात्यानं जारी केलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि मुंबईसह कोकणात पाच दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता नागरीकांनी नदी-नाल्यांच्या लगत जाऊ नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांच्या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर काल पुण्यात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईसह कोकणात पुढील चार दिवसांच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता मच्छिमारांना पुढील काही दिवस मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

WhatsApp channel