मुंबई, ठाण्यासह परिसरात आज बुधवार सायंकाळपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरू आहे. परिणामी मुंबई शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली असून कार्यालयातून घरी परतणारे चाकरमानी मुंबईकर बराच वेळ ट्रॅफिक जॅममध्ये अडकले आहे. मुंबईत दादर, कुर्ला, विक्रोळी, वांद्रे, गोरेगाव या भागांत पावसाचे पाणी साचले आहेत. कुर्ला येथील एलबीएस रोडवर पावसाचे पाणी साचले असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. हवामान खात्याने मुंबईत रेड अॅलर्ट जारी केला असून दमदार पावसाची स्थिती उद्या, गुरूवारी सकाळपर्यंत राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वेगाड्यांवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला, घाटकोपर, भांडूप स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारे लाखो चाकरमानी ट्रॅकवर थांबलेल्या लोकल रेल्वेमध्ये अडकून पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र ३० मिनिटे उशिराने ट्रेन धावत असल्याचं रेल्वेच्या सूत्रानी सांगितले. प्रत्येक लोकल रेल्वे स्टेशनवर उदघोषणा करण्यात येत असून मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यां उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्टेशनवर लोकल रेल्वे रद्द करण्याच्या उदघोषणा करण्यात येत असल्याचे प्रवाशांना सांगितले.
मुंबईत उद्या, गुरुवारी हवामान खात्याने रेड अॅलर्टचा इशारा जारी केला आहे. त्यामुळे शहरातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
'भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या, दिनांक २६ सप्टेंबर २०२४ सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याकडून राज्यात मुंबई, ठाणे, पालघरसह लातूर, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.