Heavy Rain in Vidarbha : विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांना पुर आला आहे. अनेक गावात पाणी घुसल्याने पुर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. येथील पाल नदीला पूर आला असून गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटला आहे. रात्री शिवणी नाल्यावर पाणी आल्यानं गडचिरोली -चामोर्शी मार्ग देखील बंद झाला आहे. गडचिरोलीसह नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात २४ तासांत २१७ मीमी पावसाची नोंद झाली.
राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच विदर्भात काही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाला आहे. विदर्भात गडचिरोली, नागपूर, जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना बसला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. तर चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर ते येणापूर या मार्गावरील एका पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक नागरिक अडकून पडले आहेत. भामरागड व कुरखेडा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. भामरागडमध्ये १०३ मि.मी, तर कुरखेडा येथे सुमारे ११६ मीमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे अनेक गावात पुर आला असून एनडीआरएफच्या पथकाद्वारे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. भामरागडयेथील बाजारपेठेपर्यंत पाणी साठले आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पर्लकोटा नदीवरील पूलावरून पाणी वाहू लागले आहे. या मुळे सिरोंचाकडे जाणार्या रस्त्यांसह सुमारे २७ रस्त्यांवरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. गोसिखुर्द धरण व चिचडोड बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले असल्याने या नदी मार्गातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे
चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे अनेक नद्यांना आणि ओढ्यांना पुर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिमूर तालुक्यात काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूरमध्ये शनिवारी पावसाने कहर केला. २४ तासांत नागपूर येथे २१७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. काही घरात देखील पाणी घुसल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. दरम्यान, नागपूरला आज देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या