Unseasonal Rain In Pune And Kolhapur : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला असताना ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाल्यामुळं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. याशिवाय ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळं कांदा, मका व भाजीपाल्यांच्या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर आज दुपारी चार वाजेनंतर कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक आणि नंदूरबार या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह दमदार पावसानं हजेरी लावली. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. कोल्हापुरातील गारगोटी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळं मार्केटमध्ये चोहीकडे पाणीच पाणी साचलं होतं. याशिवाय साताऱ्यातील वाई, महाबळेश्वर, खंडाळा आणि लोणंद या भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं विद्यूत पुरवठा खंडीत झाला होता.
पुण्यात वीजांच्या कडकडांसह पावसाची हजेरी...
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुण्यातील औंध, कोथरूड, डेक्कन, पुणे विद्यापीठ चौक आणि पाषाण या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कामावरून परतणाऱ्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याशिवाय पावसामुळं शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.