Maharashtra Weather Update : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने अखेरीस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांसह बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेपासून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. परिणामी नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आला असून नागरिकांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. गेल्या १० ते १२ तासांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
महिन्याभराच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये देखील मागच्या १० ते ११ तासांपासून पावसाने मुक्काम करत जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात देखील गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ चार तासांत ९७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वरुणराजाने हजेरी लावल्याने कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांना जीवदान मिळालं आहे.
राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोकणासह मुंबईतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. येत्या एक ते दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे, धाराशीव, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या