Maharashtra Rain and Weather Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने धुंवाधार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्यानाल्यांना पूर आला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असल्याने धरणांच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळं आता खरीप हंगामासाठी पेरणी करत असलेल्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आता येत्या ४८ तासांत राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याशिवाय पुणे, नाशिक आणि मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जून महिनाअखेरपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय झाला नव्हता. परिणामी खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला. त्यानंतर कोकण, मध्य-पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह ठाणे या परिसरात सलग आठवडाभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळं बळीराजाला मोठा दिलासा मिळाला. खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या असून उकाड्याने हैराण झालेल्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता कालपासून नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. येत्या दोन दिवसांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भासह कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत होत असलेल्या पावसामुळं विदर्भातील वैनगंगा आणि कोकणातील वशिष्ठी नदीला पूर आला आहे. त्यामुळं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशीव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी हवामान अंदाज पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या