मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अमरावतीत ३ तासाच्या पावसाने हाहाकार, दुचाकी गेल्या वाहून

अमरावतीत ३ तासाच्या पावसाने हाहाकार, दुचाकी गेल्या वाहून

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 19, 2022 09:44 AM IST

अमरावती जिल्ह्यात अनेक भागात शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे.

अमरावतीत ढगफुटीसदृश्य पाऊस
अमरावतीत ढगफुटीसदृश्य पाऊस

राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर आठवडाभर पावसाने दडी मारली होती. मात्र रविवारपासून राज्यात मान्सून सक्रीय होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. दरम्यान, अमरावती (Amravati) जिल्ह्यात अनेक भागात शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. चांदुर बाजार तालुक्यात करजगाव इथं सलग तीन तास झालेल्या पावसाने दुचाकी पाण्यात वाहून गेल्याचे प्रकार घडले. (weather update maharashtra rain in amravati)

मान्सून दाखल होऊनही पाऊस न आल्यानं शेतकरी चिंतेत होते. पण अमरावतीत शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. तिवसा, चांदुर रेल्वे, चांदुर बाजार, अचलपूर, परतवाडा, अंजनगाव, धारणी आणि चिखलदरा या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शनिवारी झालेल्या या पावसाने बळीराजा सुखावला असून पेरणीची तयारी सुरू झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील करजगाव, शिरजगाव, बहीरम आणि इतर भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठं नुकसान केलं. ग्रामीण भागात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाच्या पाण्यात रस्त्याकडेला उभा असलेल्या दुचाकी वाहून गेल्या. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. हरभरा, तूर, सोयाबीन यांची जवळपास २ ते अडीच हजार पोती ओली झाली आहेत.

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भ आणि दक्षिण कोकणात सोमवारपासून अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद,बीड,जालना,उस्मानाबाद,लातूर,परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या