Nanded Rain : राज्यात आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पासवाच इशारा दिला आहे. नांदेड येथे आज पावसाचा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सकाळपासून नांदेड जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली असून २६ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ईशर्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.
नांदेड येथे शनिवारी सकाळी दहा वाजता पासून रविवारी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील ६३ मंडळांपैकी २६ मंडळांमध्ये ५६ मिलीलिटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना त्यांनी बचाव पथकाला केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
जिल्ह्यामध्ये २४ तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. १० वाजेपर्यंत १३६ मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. तर किनवटसोबतच हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नद्या, नाले ओढे व तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे नद्या नाल्यांनपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात आज काही जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नागपूर,चंद्रपूर,आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 1 सप्टेंबर रोजी रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.