दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या झळांमुळे मुंबईकर घामाघुम झाले असून मुंबई आणि ठाणे शहरात येत्या शनिवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. मुंबईतील सांताक्रूज वेधशाळेत काल, गुरुवारचे कमाल तापमान ३६.९ अंश तर किमान तापमान २८ अंश नोंदवले गेले. बुधवारी सांताक्रूज वेधशाळेत मुंबईचे तापमान ३३.९ अंश नोंदवले गेले होते. बुधवारच्या तुलनेत काल, गुरुवारी शहराच्या तापमानात २ ते २.५ अंशाहून अधिक वाढ झाली होती. मुंबईत कुलाबा भागात हवेत ७९ टक्के आर्द्रता होती तर सांताक्रूज परिसरात हवेत ७२ टक्के आर्द्रतेची नोंद झाली आहे. कालचे मुंबईचे तापमान गेल्या १० वर्षांमधील मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते. सध्या हवेमध्ये प्रचंड आर्द्रता असल्यामुळे गुरुवारी मुंबई शहराचे तापमान ३६.९ जरी नोंदवले गेले असले तरी जणू ४० अंश तापमान असल्यासारखे वाटत होते. कमाल तापमानात वाढ आणि आर्द्रतायुक्त हवा यामुळे १४ मेपर्यंत मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणात उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चक्रवातविरोधी स्थिती निर्माण होत असल्याने मुंबईच्या तापमानात अधिक भर पडत असल्याचे हवामान खात्याच्या अधिकारी सुष्मा नायर यांनी सांगितले. मान्सूनच्या आगमनापर्यंत कमी अधिक प्रमाणात अशी परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान आज, शुक्रवारी मुंबईचे तापमान किंचित कमी होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काल, गुरुवारी जळगावमधील तापमान ४४.८ अंश नोंदवले गेले असून ते कालचे देशातील सर्वाधिक कमाल तापमान होते. हे तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी अधिक होते. गुरुवारी सोलापूर ४१.५, नाशिक ४०.७ आणि पुण्याचे तापमान ४१ अंश नोंदवले गेले होते. पुण्याचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी अधिक नोंदवले गेले आहे.
संबंधित बातम्या