Maharashtra Weather update : राज्यात उन पावसाचा खेळ सुरूच आहे. आज व उद्या कोकणात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ मराठवड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या थरात वाऱ्याची एक चक्रीय स्थिती मराठवाडा व लगतचच्या भागावर आहे. आज व उद्या कोकणात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ६ व ७ मे रोजी मराठवाड्यातील नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये एका दोन ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने वाहण्याची शक्यता आहे. यामुले या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धाराशिव मध्ये ६, ७ व ८ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६,७, ८ मे रोजी विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया व यवतमाळ मध्ये तर ८ मे रोजी भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनांसह विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना तिन्ही दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुणे व लगतच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात थोडी घट झाली आहे. पुण्याचे तापमान शनिवारी ३९.६ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमानात १ ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली. राज्यात शनिवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली. येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अकोला येथे झाली. अमरावतीत ४३, मालेगावमध्ये ४२, बुलढाणा, ब्रम्हपूरित ४० आणि ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
संबंधित बातम्या