मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 17, 2023 10:05 AM IST

Indurikar Maharaj : लिंगभेद करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी हायकोर्टाने इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

Indurikar Maharaj Controversial Statement
Indurikar Maharaj Controversial Statement (HT)

Indurikar Maharaj Controversial Statement : किर्तनातून लिंगभेद करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. हायकोर्टाने जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करत इंदुरीकर महाराजांविरोधात कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय त्यांना बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही देण्यात आला आहे. त्यानंतर आता इंदुरीकर महाराजांच्या वकिलांनी कायदेशीर लढाईसाठी तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

इंदुरीकर महाराज यांचे वकील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, इंदुरीकर महाराज यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार संगमनेर जीएमएफसीने कलम १५६ (३) गुन्हा दाखल केला होता. यावर आम्ही जिल्हा न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने जीएमएफसीचा आदेश रद्द करत इंदुरीकर महाराजांना दिलासा दिला, परंतु आता हायकोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच कोर्टाने आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला असून त्यात आम्ही कायदेशीर बाजू मांडणार असल्याचं इंदुरीकर महाराजांचा वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता इंदुरीकर महाराज यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार असून ते राज्याबाहेरही किर्तनाला जात असतात. लाखो भाविक त्यांचे चाहते असून ग्रामीण भागात त्यांचं किर्तन ऐकणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गेल्या काही महिन्यांपासून किर्तनातून इंदुरीकर महाराज लिंगभेदाला उत्तेजन देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट हायकोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

WhatsApp channel