Datta Dalvi : मुंबईतील विक्रोळी इथं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फेरीवाल्यानं माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली आहे. रस्ता सोडून मागे सरकून बसायला सांगितल्यावरून हा प्रकार घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकारामुळं फेरीवाल्यांच्या दादागिरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबईत लाखो फेरीवाले असून अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या गर्दीमुळं रस्त्यावर चालणंही कठीण झालं आहे. त्यावरून रोजच्या रोज वाद होत असतात. साकीनाका परिसरात काही दिवसांपूर्वी याच कारणावरून हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर आता विक्रोळीत असाच प्रकार समोर आला आहे. इथं एका फेरीवाल्यानं थेट माजी महापौरांनाच धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्ता दळवी यांनी घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले, सकाळच्या वेळी मी व्यायामशाळेतून घरी परतत असताना एका भाजी विक्रेत्यानं थेट फूटपाथवर क्रेट ठेवलेल्या दिसल्या. मी त्या क्रेट बाजूला करताच फेरीवाला चवताळून माझ्या अंगावर आला आणि धक्काबुक्की करू लागला. मी शांततेनं हा प्रकार हाताळला असं त्यांनी सांगितलं.
‘मी विक्रोळीचं प्रतिनिधित्व १० वर्षे केलं होतं. त्या काळातही एक फेरीवाला रस्त्यावर बसत नव्हता. ४२ ते ४५ फुटी रस्ते आहेत, पण फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळं ते १० फुटांचेही राहिले नाहीत. फेरीवाल्यांनी धंदा करावा, पण त्यांनी लोकांचा अधिकार हिसकावून घेऊ नये,’ असं दत्ता दळवी म्हणाले. दळवी यांनी संबंधित फेरीवाल्याची पोलीस तक्रार केली आहे.
फेरीवाल्यांच्या या मुजोरीसाठी आणि अतिक्रमणासाठी दत्ता दळवी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. 'महापालिकेच्या एस वॉर्डचे सर्व अधिकारी विकले गेले आहेत. लोकांना होणाऱ्या या त्रासाकडं एकाही लोकप्रतिनिधीचं लक्ष नाही. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. त्यात फेरीवाल्यांचा झोन ठरवून देण्यात आलाय. शिवाय, चारचाकी गाड्या जप्त करण्याचेही आदेश आहेत. मात्र त्याचं अजिबात पालन होत नाही. आम्ही यासाठी प्रयत्न करत असतो. पण एस वॉर्डचे अधिकारी अजिबात साथ देत नाही. हप्तेखाऊ लोक आहेत. लायसन्स डिपार्टमेंट हप्ते गोळा करण्याचं काम करतं, असा आरोप दळवी यांनी केला.
फेरीवाल्याशी वाद झाला तेव्हा मी तिथं एकटा होतो. मी एका प्रतिष्ठेच्या पदावर राहिलेलो असल्यानं मी त्याच्याशी अधिक वाद घातला नाही. मी त्यांना पुरून उरू शकतो इतकी ताकद माझ्याकडं आहे. मात्र हे ज्यांचं काम आहे, त्यांनी केलं पाहिजे, असं दत्ता दळवी म्हणाले.
संबंधित बातम्या