मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  vaibhav pandya : हार्दिक पंड्या याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक! सावत्र भाऊ वैभव पंड्या याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

vaibhav pandya : हार्दिक पंड्या याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक! सावत्र भाऊ वैभव पंड्या याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 11, 2024 10:45 AM IST

Vaibhav Pandya Arrested : हार्दिक व कृणाल पंड्या यांची सुमारे ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्या याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

हार्दिक पंड्या याला ४ कोटीचा चुना लावला! सावत्र भाऊ वैभव पंड्याला पोलिसांनी केली अटक
हार्दिक पंड्या याला ४ कोटीचा चुना लावला! सावत्र भाऊ वैभव पंड्याला पोलिसांनी केली अटक (PTI)

Vaibhav Pandya Arrested : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याचा सावत्र वैभव पंड्या याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका पार्टनरशीप फर्ममधून सुमारे ४.३ कोटी रुपये वळवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वैभव पंड्याच्या या फसवणुकीमुळं हार्दिक आणि कृणाल पंड्या या दोघांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भात वृत्त दिलं आहे. तीन वर्षांपूर्वी हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघांनी मिळून पॉलिमरचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी काही नियम ठरवण्यात आले होते. त्यानुसार या व्यवसायात हार्दिक व कृणाल हे प्रत्येकी ४० टक्के भांडवल गुंतवणार होते, तर वैभव २० टक्के पैसे गुंतवून दैनंदिन कामकाज सांभाळणार होता. 

प्रत्येकाच्या शेअर्सनुसार नफ्याचं वाटप करायचं असं ठरलं होतं. मात्र, वैभवनं सावत्र भावांना न सांगता याच व्यवसायात आणखी एक कंपनी स्थापन केली आणि त्यामुळं भागीदारी कराराचं उल्लंघन झालं. परिणामी मूळ भागीदारीतून मिळणारा नफा कमी होऊन अंदाजे तीन कोटी रुपयांचे नुकसान झालं. याशिवाय वैभवनं गुपचूप स्वत:च्या नफ्यातील वाटा २० टक्क्यांवरून ३३.३ टक्क्यांपर्यंत वाढवला आणि हार्दिक आणि कृणाल पंड्याला आर्थिक फटका बसला, असा आरोप आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वैभव पंड्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईवर हार्दिक व कृणाल यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

हार्दिक आणि कृणाल आयपीएलमध्ये व्यग्र

हार्दिक व कृणाल हे दोघे क्रिकेटर बंधू सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत आहेत. हार्दिक पंड्या हा सध्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो, तर कृणाल लखनौ सुपर जायंट्सकडून उत्तम कामगिरी करत आहे.

२०२३ च्या विश्वचषकादरम्यान गुडघ्याच्या दुखापतीनं ग्रस्त असलेला हार्दिक आता सावरला आहे. मात्र, मुंबईचा कर्णधार म्हणून त्याच्या निवडीला फ्रँचायझीच्या चाहत्यांकडून मोठा विरोध झाला होता. कर्णधार म्हणून या अष्टपैलू खेळाडूची सुरुवात खडतर होती कारण एमआयला सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. मात्र, गेल्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करून मुंबईनं पहिला विजय नोंदवला.

IPL_Entry_Point