राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे अल्पवयीन मुलीवर जिमचालक तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. आरोपी व त्याला मदत करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी आडपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
संग्राम देशमुख असे आरोपीचे नाव आहे तर त्याला सुमित्रा लेंगरे या महिलेने मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुलीवर लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडिओही आरोपींनी बनवला होता. या कामात संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती. संग्राम देशमुख आटपाडीमध्ये एक जिम चालवत आहे. दरम्यान आरोपीकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज नागरिकांनी आटपाडी शहर बंदची हाक दिली आहे. त्यानुसार शहरातील सर्व व्यवहार आज बंद आहेत. नागरिकांनी आटपाडी बसस्थानकापासून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी, सरकारी वकील या केसमध्ये द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मुलीवर काही दिवसापूर्वी बलात्कार झाला असून हे प्रकरण आता उघडकीस आले आहे.
आरोपी संग्राम देशमुखने या प्रकरणाची वाच्याता केल्यास पीडित मुलीच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी दिली दिली होती, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे. आरोपीच्या अवैध धंद्यांची चौकशी करावी. त्याच्याशी हितसंबंध असणाऱ्यांचा शोध घेऊन चौकशी व्हावी. या गुन्हेगारांना सहकार्य करणाऱ्यांनाही शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने आटपाडीकर जनता आक्रमक झाली असून, त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा तर त्याला मदत करणाऱ्या महिलेची चौकशी करून तिला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. आरोपीने अन्य मुली व महिलांवरही अशाच पद्धतीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर येत आहे.