Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना बेशिस्त भोवली! दोन वर्षांसाठी वकिली सनद रद्द
Bombay HC on Gunaratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला चिथावणी दिल्याच्या प्रकरणावरून वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टानं मोठा दणका दिला आहे.
Gunaratna Sadavarte : विविध प्रकरणांच्या याचिका कोर्टात दाखल करत कोर्टाबाहेर थेट राजकीय भूमिका घेणारे वादग्रस्त वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्याद्वारे सदावर्ते यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार होती. त्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली. परंतु हायकोर्टानं बार काऊन्सिलच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळं सदावर्तेंवरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
ट्रेंडिंग न्यूज
राज्यातील मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांसमोर आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. सदावर्ते यांच्याविरोधात बार कौन्सिलमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर बार कौन्सिलने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्यानंतर आता हायकोर्टानंही सदावर्तेंना दिलासा न दिल्यामुळं त्यांना पुढील दोन वर्ष वकिली करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिल्यामुळंच एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास्थानावर दगडफेक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय मराठा आंदोलनावेळी वकिली पेशात काळ्या फिती लावल्याच्या मुद्द्यावरही बार कौन्सिलने आक्षेप घेतला होता. इतकंच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांची फसवणून करत सदावर्ते यांनी त्यांच्याकडून पैसे गोळा केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांवर सदावर्ते यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणांची गंभीर दखल घेत बार कौन्सिलने त्यांची वकिली दोन वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.