Guillain-Barre Syndrome Outbreak: पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर आली आहे. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. मृत रुग्णाला काही दिवसांपूर्वी जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रुग्ण पुण्यातील डीएसके विश्व धायरी परिसरात राहायला होता. मयत रुग्ण एका खाजगी कंपनीत सनदी लेखपाल म्हणून नोकरी करत होता. तो पु्ण्यात असताना ११ जानेवारी रोजी त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही कार्यक्रमानिमित्त तो सोलापुरात त्याच्या गावी गेला. परंतु, सोलापुरात गेल्यानंतर अशक्तपणा वाढल्याने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत रुग्णाला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्णावर पाच दिवस आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला सामन्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र, काही वेळात त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि भाऊ, असा परिवार आहे.
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात आतापर्यंत जीसीबीचे एकूण ७३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील त्यापैकी १४ जणांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसबाधितांपैकी ४७ पुरुष आणि २६ महिला आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत २४ रुग्ण वाढले असून, त्या पार्श्वभूमीवर रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) तयार करण्यात आली आहे. आठवडाभरात २० हून अधिक रुग्ण आढळून येणे हा आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
संसर्गाची लक्षणे पाहण्यासाठी आणि जीबीएसबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. महापालिका आणि जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत सुमारे सात हजार २०० घरांचे सर्वेक्षण केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजाराची लागण झाल्यास रोगप्रतिकारक शक् कमी होते आणि रुग्ण कमजोर होतो. आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, नेमके कशामुळे हा आजार होतो, याबाबत अद्याप निश्चित उत्तर मिळालेले नाही. व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर, कधीकधी लसीकरण किंवा मोठ्या शस्त्रक्रियेनंतर, हा रोग होतो, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या