GBS Treatment: देशात सध्या अनेक प्रकारचे गंभीर आणि संसर्गजन्य आजार पसरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वात प्रथम एचएमपीव्ही आणि नंतर एचएन१ यांसारख्या आजाराने राज्याची चिंता वाढवली असताना पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम विषाणू म्हणजेच जीबीएसने थैमान घातले आहे. पुण्यात १०० हून अधिक रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. त्यापैकी १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वैद्यकीय टीम पुण्याला पाठवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा केली. दरम्यान, जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे वृत्त आहे.
राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १९ रुग्ण ९ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर ५०-८० वयोगटातील २३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पुणे क्लस्टरमधील पहिला जीबीएस रुग्ण ९ जानेवारी २०२५ रोजी आढळला. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांकडून घेतलेल्या काही जैविक नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आढळून आले. पुण्यात, विशेषतः ज्या भागात रुग्णांची नोंद होत आहे, तेथे अधिकारी पाण्याचे नमुने घेत आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी पीटीआयला सांगितले की, लहान मुले आणि तरुण वयोगटातील दोघांनाही जीबीएसची लागण होऊ शकते. जीबीएसमुळे महामारी किंवा जागतिक महामारी होणार नाही. बहुतेक लोक या आजारातून बरे झाले आहेत. डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले की, बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस आजाराची लागण होते.सीडीसीच्या मते, कॅम्पिलोबॅक्टर संसर्ग हे युनायटेड स्टेट्समध्ये जीबीएसचे सर्वात सामान्य कारण आहे. पुण्यातही अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करत आहेत.
जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या ६८ वर्षीय महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, तिच्या उपचारात एकूण १३ इंजेक्शन्स वापरली गेली.
जीबीएसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हाता- पायाला मुंग्या येणे यांचा समावेश आहे. जीबीएसच्या रुग्णांना दोन्ही पायांमध्ये ही लक्षणे जाणवतात. यानंतर हळूहळू संपूर्ण शरिरात वेदना जाणवतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जीबीएसमुळे अचानक सुन्नपणा येतो आणि स्नायू कमकुवत होतात. यासोबतच, या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र कमजोरी अशी लक्षणे देखील आहेत.
जीबीएसग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. सीडीसीच्या मते, बहुतेक लोक लक्षणे दिसू लागल्यानंतर २-३ आठवड्यांच्या आत बरे होऊ लागतात. त्याच वेळी, पूर्णपणे बरे होण्यासाठी काही आठवडे किंवा काही वर्षे लागू शकतात. बरे झालेल्या अनेक रुग्णांना मज्जातंतूंचे गंभीर नुकसान झाले आहे.
संबंधित बातम्या