Guillain-Barre Syndrome in Pune: पुण्यात कोरोनानंतर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. झिका, स्वाइन फ्लू, मलेरिया, कोरोना या सारख्या आजाराने पुणेकर त्रस्त असताना आता आणखी एका आजाराने पुणेकरांचे टेशन वाढवलं आहे. ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ असे या आजाराचे नाव आहे. या न्यूरोलॉजिकल आजाराचे पुण्यात २४ संशयित रूग्ण आढळले आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील ६ खासगी रुग्णालयांमध्ये हे रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी ८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. यातील २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. हा आजार नेमका काय आहे? तो शरीरावर काय परिणाम करतो याची माहिती घेऊयात
पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ ने बाधित रुग्ण आढळले असून हा आजार बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती व मज्जातंतूवर थेट परिणाम करतो. यामुळे हाता-पायांमधील ताकद कमी होते. तसेच मुंग्या येणे, गिळतांना व बोलतांना त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या आजाराने बाधित सर्वात कमी वयाचा रुग्ण हा २ वर्षांचा तर सर्वाधिक वयाचा रुग्ण हा ६८ वर्षांचा आहे.
'गुलेन बॅरी सिंड्रोम' हा जीवाणू तसेच विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. ऑटो-इम्युन डिसीज, एखादी मोठी शस्त्रक्रिया होणे किंवा मेंदूशी संबंधित आजार, अशा विविध कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता आहे. प्रतिकारशक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते. त्यामुळे हात-पायांमधील ताकद कमी होते तसेच शरीराच्या हालचाली देखील कमी होतात. या आजाराचे निदान हे स्पायनल फ्लुईडची चाचणी करून केली जाते. या मुळे अर्धांगवायू येण्याची शक्यता देखील असते. तसेच काही आठवडे यावर उपचार घेतल्यावर हा आजार बरा होतो. या आजारात प्रामुख्याने नसांवर परिणाम होतो तर स्नायू कमकुवत होतात. यामुळे वेदना होतात व संवेदना देखील कमी होतात. हाताची बोटं, पायांत वेदना होतात तर चालताना देखील अनेक समस्या होतात.
'गुलेन बॅरी सिंड्रोम' ने रुग्ण आढळताच महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. बाधित २४ रुग्णांपैकी ५ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत, तर अन्य रुग्ण पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील आहेत. सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड रस्ता, कोथरुड, कसबा भागात आढळले आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरात पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. काही भागात शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जाते. त्यामुळे त्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.
या आजाराने बाधित सर्वाधिक रुग्ण हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. या ठिकाणी १० रुग्ण आहेत. तर सह्याद्री (डेक्कन) हॉस्पिटलमध्ये १, भारती रुग्णालय ३ , काशीबाई नवले रुग्णालय ४, आणि पूना हॉस्पिटलमध्ये ५ तर औंध येथील अंकुरा हॉस्पिटलमध्ये १ रुग्ण उपचार घेत आहे.
संबंधित बातम्या