Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता कोल्हापुरात देखील या आजारचे रुग्ण आढळले आहे. दोघाजणांना याची लागण झाली असून त्यांचावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एक रुग्ण हा कर्नाटकातील कोगणोळी इथला आहे. तर दुसरा हा हुपरी येथील आहे. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन कोल्हापूर प्रशासाने केले आहे. दरम्यान, केंद्राचे आरोग्य पथक राज्यात दाखल झाले असून ते डॉक्टरांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यात सर्वात आधी पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे. पुण्यात सध्या १११ रुग्ण असून यात ६८ पुरुष तर ३३ महिला आहेत. यातील १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसची प्रकरणे हाताळण्यासाठी राज्याला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय आरोग्य पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. हे पथक पुण्यात या आजाराबद्दल माहिती घेणार असून, त्या बाबत माहिती घेणार आहेत.
राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोममुळे सोलापूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा रूग्णदेखील पुण्यात राहणारा होता. मात्र, त्याचा मृत्यू सोलापूरमधील खासगी रुग्णालयात झाला. पु्ण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने सोमवारी सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात पाठवले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.
केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली, निमहान्स, बेंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या ७ तज्ज्ञांचा समावेश आहे. पुण्यातील एनआयव्हीचे तीन तज्ज्ञ स्थानिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. हे केंद्रीय पथक राज्याच्या आरोग्य विभागासोबत काम करणार असून या आजाराचा आढावा घेणार आहे. तसेच आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांबाबत देखील शिफारस करणार आहे.
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पुण्यात घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. तब्बल २५ हजार घरांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. हा आजार इतर ठिकाणी पसरू नये यासाठी शीघ्र प्रतिसाद पथकांना बाधित भागाला भेट देऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील जीबीएसचे बहुतांश रुग्ण हे नांदेड परिसरात राहणार आहे.
संबंधित बातम्या